पुणे : किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीबाबत फारशी जागरूकता नसते. याचबरोबर अनेक गैरसमजही निर्माण झालेले असतात. मासिक पाळीच्या काळात योग्य काळजी न घेतल्यास आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीबद्दल जागरूकता निर्माण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. राज्यातील शाळांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

‘आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट’चा उपक्रम ‘उजास’ने याबाबत सरकारबरोबर दोन वर्षांचा करार केला आहे. मासिक पाळीदरम्यानच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पुणे जिल्ह्यात सुरुवातीला हा उपक्रम राबविण्यात आला. आता राज्यातील १३ जिल्ह्यांमधील ७४५ शाळांमधील ७३ हजार ५९१ हून अधिक किशोरवयीन मुलींपर्यंत पोहोचण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. शालेय आरोग्य कार्यक्रमांमध्ये मासिक पाळी आरोग्य शिक्षणाचा समावेश करून या उपक्रमामध्ये ‘उजास’च्या पर्यावरणपूरक हिरव्या सॅनिटरी पॅडचे वितरण मुलींना केले जाईल. याचबरोबर मुलींमधील मासिक पाळीबाबतचे गैरसमज दूर करण्याचे, योग्य माहिती पोहोचवण्याचे प्रयत्न केले जातील. मासिक पाळीबद्दल माहितीची देवाणघेवाण करणे सामान्य आहे, हे सर्वांना समजावे यासाठी शालेय मुले, शिक्षक आणि समाजातील घटकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाईल.

‘उजास’ने अलीकडे केलेल्या पाहणीत मासिक पाळीबद्दल किशोरवयीन मुलींमध्ये असलेली अपुरी माहिती समोर आली होती. केवळ ५७ टक्के विद्यार्थ्यांना मासिक पाळी म्हणजे काय हे बरोबर माहिती होते. मासिक पाळीतील रक्त अशुद्ध असते, हा ३१.४८ टक्के मुलींचा समज होता. मासिक पाळीच्या वेळी स्वच्छता सामग्री किती वेळा बदलावी हे १९ टक्क्यांपेक्षा कमी मुलींना माहिती होते आणि फक्त ५० टक्के विद्यार्थ्यांना मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छता न बाळगल्यास होणाऱ्या आरोग्य धोक्यांबद्दल माहिती होती.

मासिक पाळी आरोग्य हा सार्वजनिक आरोग्याशी संबंधित एक प्रमुख मुद्दा आहे. मोकळा संवाद आणि सातत्यपूर्ण कृतीद्वारे त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांत पुण्यात आम्ही शाळा आणि समाज घटकांशी संवाद साधत आहोत. जागरूकता सत्रे आणि सॅनिटरी पॅड वितरणाद्वारे ५० हजार व्यक्तींपर्यंत हा उपक्रम पोहोचला आहे. आता राज्यभरात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. – पूनम पाटकर, प्रमुख, ‘उजास’.