पुणे : समाजकल्याण विभागातर्फे राज्यभरात चालवल्या जाणाऱ्या ५५ शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थी क्षमता वाढवण्यात आली आहे. त्यानुसार राज्यभरात १ हजार २९५ जागा वाढवण्यात आल्या असून, जागा वाढल्यामुळे आता अधिक विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध होऊ शकणार आहे.
समाजकल्याण विभागाने मागासवर्गीय मुला-मुलींची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक उन्नती व्हावी; तसेच समाजातील इतर घटकांप्रमाणे त्यांना जीवन जगता यावे, उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने मागासवर्गीय मुला-मुलींच्या शिक्षणासाठी विभागांतर्गत शासकीय वसतिगृहे ही योजना राबण्यात येते.

त्या अंतर्गत राज्यभरात ४४१ सरकारी वसतिगृहे कार्यरत आहेत. त्यात २३० मुलांची, तर २११ मुलींची वसतिगृहे सुरू आहेत. या वसतिगृहांमध्ये २० हजार ३२० मुली आणि २३ हजार ५७० मुले अशी एकूण ४२ हजार ८९० विद्यार्थी क्षमता आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना सकाळची न्याहरी, दोन वेळचे जेवण, दैनंदिन खर्चासाठी निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य, मुलींना स्वच्छता प्रसाधनांसाठी अतिरिक्त भत्ता, शालेय गणवेश, वैद्यकीय साहित्य, रेनकोट, गमबूट, कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, शैक्षणिक सहल, कार्यशाळा, स्नेहसंमेलन, करमणूक व्यवस्थेसाठी भत्ता, क्रीडा वस्तू खरेदीसाठी रक्कम अशा सुविधाही सरकारकडून दिल्या जातात.

समाजकल्याण विभागाची ४४१ वसतिगृहे शासकीय इमारतींमध्ये स्थलांतरित झाली आहेत. त्यापैकी ५५ वसतिगृहांच्या विद्यार्थीसंख्येत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आधी ७५ ते ८० विद्यार्थी क्षमता असलेल्या वसतिगृहांमध्ये आता १०० विद्यार्थ्यांची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे ५५ वसतिगृहांमध्ये असलेल्या ४ हजार १४० जागा वाढून आता ५ हजार ४३५ जागा उपलब्ध झाल्या आहेत. या वाढलेल्या जागांसह लातूर येथे बांधकाम पूर्ण झालेल्या शासकीय इमारतीत मुलांसाठी २५० विद्यार्थी क्षमतेचे नवीन वसतिगृह समाजकल्याण विभागाने मंजूर केले आहे.