पुणे : ‘राज्यातील पूरस्थिती निर्माण झालेल्या भागांमध्ये राज्य सरकारच्या वतीने मदत दिली जात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवश्यक ती पावले उचलली असून, लवकरच संकटग्रस्तांना केंद्र सरकारची मदत मिळेल,’ असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधितांना मदतीचा हात देण्यासाठी पुणे शहर भाजपच्या वतीने संकलित केलेले धान्य आणि वस्तू प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. या वेळी उपस्थित पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ‘राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी व नागरिकांना मदत करणे गरजेचे आहे. राज्य सरकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवश्यक ती पावले उचलली आहेत.
भारतीय जनत पक्ष नेहमीच संकटाच्या वेळी मदतीचा हात देतो. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले होते. त्यानुसार भाजप पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने कार्यकर्त्यांनी धान्य व वस्तू जमा केल्या आहेत. जमा झालेले धान्य आणि वस्तू पक्षाकडून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना दिल्या जाणार आहेत. हे साहित्य सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले जाईल. जेथे गरज असेल, तेथे ते साहित्य पोहोचवतील,’ असे चव्हाण म्हणाले.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली जात आहे.
विरोधकांकडून देखील राज्य सरकारने या पूर परिस्थितीचा आढावा घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी लावून धरली आहे. मात्र यावर कोणतीही भूमिका अद्यापही राज्यकर्त्यांकडून घेतली जात नाही.
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना देखील ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता. त्यांनी बोलणे टाळले. या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत धन्यवाद असे म्हणत चव्हाण यांनी काढता पाय घेतला.
राज्यातील पुराची स्थिती पाहता शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा रद्द करून पूरग्रस्तांना मदत करावी, अशी मागणी केली जात आहे, असा प्रश्न चव्हाण यांना विचारला असता. त्यांनी काय करायचे हा त्यांचा प्रश्न आहे, असे म्हणून अधिक बोलणे देखील टाळले.