पुणे : केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या धर्तीवर राज्यातही लवकरच स्वतंत्र आयुष मंत्रालय सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय आयुष आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रताप जाथव यांनी दिली. आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून निरोगी, सशक्त आणि विकसीत भारताचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी आणि केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने कोरेगाव पार्क येथे ‘सीएच-२ वर्ल्ड फाऊंडेशन’चे उदघाटन प्रताप जाधव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. भारतीय प्राकृतिक संस्थेच्या संचालिका सत्यलक्ष्मी, डेक्कन विश्वविद्यापीठाचे कुलपती प्रसाद जोशी, बंधन गुप्ता, नीलम चतुर्वेदी उपस्थित होते.

जाधव म्हणाले, ‘नागरिकांच्या निरामय आरोग्यासाठी आयुष मंत्रालय प्रयत्नशील आहे. देशभरात पारंपरिक उपचारपद्धतीचा प्रचार आणि प्रसार केला जात आहे. ॲलोपॅथी उपचारांची आवश्यकता आहे. मात्र, पारंपरिक आयुर्वेदाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. सर्व वैद्यकीय शाखांनी एकात्मिक उपचारपद्धती अवलंबणे आवश्यक आहे. आयुष मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय हे दोन्ही विभाग एकमेकांना पूरक आहेत. जिल्हा रुग्णालयांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत सर्व ठिकाणी आयुषचे डॉक्टर उपलब्ध आहेत. असाध्य आजारांसाठी सर्व पॅथीच्या डॉक्टरांनी एकत्र येऊन चिंतन करणे आवश्यक आहे.’

‘सध्याच्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा हा आजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आहार, झोप, व्यायाम याबाबत कोणतेही नियम पाळले जात नाहीत. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सुमारे ४० टक्के लोक लठ्ठपणाने ग्रस्त असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार यांसह मानसिक आजारही जडतात. या प्रकारच्या आजारांवर पारंपरिक आयुष पद्धतीने उपचार करता येतात,’ असेही जाधव यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रियंका खंडेलवाल-गुप्ता यांनी केले.