अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पामुळे दक्षिणेकडील राज्यांत सध्या पाऊस होत असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रातील दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत झाला आहे. या विभागात अंशत: ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, काही भागांत हलक्या सरींनी हजेरी लावली. पुढील दोन ते तीन दिवस पावसाळी स्थिती कायम राहणार आहे. विदर्भात मात्र हलकी थंडी राहणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : बिबवेवाडीतील इंदिरानगर आगारात पीएमपी बसला आग; प्रवासी नसल्याने अनर्थ टळला

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे गेल्या आठवड्यात राज्यातील तापमानात मोठी घट झाली होती. २० आणि २१ नोव्हेंबरला राज्याच्या सर्वच भागातील किमान तापमानात ४ ते ६ अंशांनी घट होऊन थंडीचा कडाका वाढला होता. मात्र, उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह घटण्यासह दक्षिणेकडील राज्यात पावसाळी स्थिती निर्माण झाली. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अंशत: ढगाळ वातावरणाची स्थिती तयार झाली. त्यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ होऊन थंडी गायब झाली. त्याचप्रमाणे दिवसाच्या कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटकाही वाढला आहे. सध्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात वाऱ्यांची चक्रीय स्थिती आहे. या भागातून बाष्प येत आहे. त्यामुळे केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आदी भागांत पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात त्याचा परिणाम दिसून येत आहे. दक्षिण कोकणात काही ठिकाणी शुक्रवारी पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रात अनेक भागांत संध्याकाळी आकाश ढगाळ झाले होते. ही स्थिती पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra weather news rainy weather in konkan west maharashtra pune print news zws