लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : प्रेमविवाह करण्यासाठी तरुणीला घेऊन ट्रकचालक पसार झाला. पशुखाद्य असलेला हा ट्रक लोणी काळभोर परिसरातील शिंदवणे घाटात वळणावर उलटल्याने ट्रकचालक तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. अपघातात तरुणी गंभीर जखमी झाली. डोळ्यादेखत भावी जोडीदाराचा मृत्यू झाल्याने प्रेमविवाह करण्याची त्यांची इच्छा अधुरी राहिली आहे.

रामेश्वर लक्ष्मण शिंदे (वय २१, रा. शेलू मानवद, ता. परतूड, जि. परभणी) असे मृत्युमुखी पडलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. अपघातात २३ वर्षीय तरुणी जखमी झाली असून, ती मूळची सांगली जिल्ह्यातील मिरजची आहे. ट्रकचालक रामेश्वर आणि तरुणीचे प्रेमसंबंध होते. तरुणी विवाहित होती. तिचे पतीशी पटत नसल्याने ती माहेरी राहत होती. दोघे आंतरधर्मीय विवाह करणार होते. त्यामुळे त्यांच्या विवाहास विरोध होता. तरुणीचे वडील वाहतूकदार आहेत. शिंदे आणि तरुणीच्या वडिलांची ओळख होती. तरुणीला घेऊन शिंदे मिरजेतून पसार झाला. ती बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती.

आणखी वाचा-पिंपरीत जेष्ठ व्यवसायिकाला लुटणाऱ्या चौघांना बेड्या; मिर्चीपूड टाकून लुटले होते २७ लाख

पशुखाद्य असलेला ट्रक घेऊन शिंदे आणि तरुणी लोणी काळभोर परिसरातील शिंदवणे घाटातून रात्री साडेअकराच्या सुमारास निघाले होते. शिंदवणे घाटातून ट्रक उरळी कांचनकडे निघाला होता. घाटातील वळणावर ट्रकचालक शिंदेचे नियंत्रण सुटले आणि ट्रक उलटला. अपघातात ट्रकचालक शिंदे गंभीर जखमी झाला. त्याच्याबरोबर असलेली तरुणी गंभीर जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच शिंदेचा मृत्यू झाला होता. तरुणीच्या पायाला दुखापत झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती उपनिरीक्षक देशमुख यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man dead in accident while going for own wedding desire for love marriage is unfulfilled pune print news rbk 25 mrj