लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात संघटना म्हणून खूप मोठी ताकद लावणार आहे. भाजपसोबत गेलेल्या गटाचे काय होणार हे त्यांनाच माहिती आहे. तिकडे असलेल्या अनेकांशी बोलणे झाले आहे. तिकडे गेलेले (अजित पवार) अनेकजण संपर्कात आहेत. काही दिवसात ते इकडे आलेले बघायला मिळतील. टप्याटप्याने प्रवेश होतील, असे भाष्य आमदार रोहित पवार यांनी सांगितले. अजूनही वेळ गेलेली नाही. पण, काहीजण गेले तेही बरेच झाले असेही ते म्हणाले.

पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष तुषार कामठे, प्रदेश युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, गणेश भोंडवे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, देवेंद्र तायडे, काशिनाथ नखाते, माधव पाटील आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-पिंपरी-चिंचवड: अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात पुतणे रोहित पवारांची बाईक रॅली! अजित पवार गटाला धक्का देण्यासाठी खेळी?

पवार म्हणाले, तिकडे खिचडी झाली आहे. कोणाला कुठे उमेदवारी मिळेल याचा गोंधळ आहे. आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. पूर्वीच्या काळाप्रमाणे काही होणार नाही. पूर्वी शहरात एका नेत्याच्या पाठीमागे चार-पाच लोक असायचे, तेच कोणाला नगरसेवक करायचे ते ठरवायचे, त्यामुळे शहरात पक्ष वाढला नाही. तिकडे गेलेल्या चार-पाच स्थानिक नेत्यांमुळे पालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता गेली. त्यामुळे तिकडे गेले ते बरे झाले. आता चर्चा, सर्वेक्षण करून उमेदवारी दिली जाईल. मधल्या काळात शहरातील सर्व जबाबदारी अजित पवार यांच्याकडे दिली होती. त्यांनी अनेकांना उमेदवारी दिली. त्यामुळे अनेकजण त्यांच्यासोबत गेले, असेही रोहित पवार म्हणाले

पवना बंदिस्त जलवाहिनी, श्वान नसबंदी या घोटाळ्यांचे पुढे काय झाले. त्याच्या खोलात जाणार आहोत. पवार साहेबांसोबत काम केलेले लोक आमच्यासोबत आहेत. पुढील पंधरा दिवसांत मेळावा घेणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस शरद पवार यांची सभा घेतली जाणार आहे. लोकांच्या प्रश्नांवर आंदोलन करणार आहे. प्रशासकीय राजवटीत मनमानी पद्धतीने काम सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Many people from ajit pawar group are in touch says mla rohit pawar pune print news ggy 03 mrj