पुणे : जिल्ह्यातील प्रमुख नद्या प्रदूषणुक्त करण्यासाठी मोठ्या नद्यांना मिळणाऱ्या उपनद्या आणि नाल्यांवरील पाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली जाईल, अशी माहिती सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी दिली.

जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीची (दिशा) आढावा बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी मोहोळ बोलत होते. राज्याच्या नगरविकास आणि सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पठारे, खेडचे आमदार बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखरसिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह अन्य विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यात सुरू असलेले रस्ते विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय आणि कल्याण विभागाच्या योजनांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील समन्वय वाढविण्याची सूचना यावेळी करण्यात आली. ‘औद्योगिक, शैक्षणिक तसेच माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात देशात जिल्हा अग्रस्थानी आहे. जिल्ह्यातील जलप्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील गटारातील तसेच औद्योगिक सांडपाणी थेट नद्यांमध्ये मिसळल्याने पाणी प्रदूषण वाढले आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रकल्प उभारले जात आहेत. मात्र, प्रमुख नद्यांवरच प्रकल्प उभारून उपयोग होणार नाही, तर उपनद्या, नाले आणि गटार पाण्यावरही शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया होणे अत्यावश्यक आहे,’ असे मोहोळ यांनी सांगितले.

मोहोळ म्हणाले, ‘स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पुणे जिल्हा परिषदेकडून १० नवे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. यामुळे कचरा व्यवस्थापन, मल:निस्सारण तसेच स्वच्छता उपक्रमांना चालना मिळून पर्यावरण संतुलन साधण्यास मदत होणार आहे. नदी स्वच्छता, शाश्वत कचरा व्यवस्थापन, हरित ऊर्जा निर्मिती, ग्रामीण विकास आणि शहरी भागातील मूलभूत सुविधा या सर्वच क्षेत्रांमध्ये कार्यक्षम आणि पारदर्शक अंमलबजावणीला जिल्हा विकास समितीचे प्राधान्य आहे.’

मेट्रोच्या विस्ताराला लवकरच गती

शहरातील रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पुणे मेट्रो उपयुक्त ठरत आहे. जुलैमध्ये एक लाख ९२ हजार प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला. ऑगस्टमध्ये ही संख्या २ लाख १३ हजार एवढी झाली आहे. सध्या मेट्रोच्या विस्तारीकरणाचे प्रस्ताव वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत. त्याची तांत्रिक तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील कामे सुरू होतील. त्यादृष्टीने या कामांना गती द्यावी, अशी सूचनाही केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

विमानतळ टर्मीनलच्या नूतनीकरणाचे काम डिसेंबरपर्यंत

पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मीनलच्या नूतनीकरणाचे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. तसेच नव्या टर्मीनलच्या जागेच्या अधिग्रहणाचे काम सुरु करण्यात आले असून आखणीचे (मार्किंग) काम पूर्ण झाल्याचेही डुडी यांनी स्पष्ट केले.