मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेल्या भागाची पाहणी करत नुकसानीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारवर टीका केली. तसेच पाणी सोडताना लोकांना सांगायला हवं होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जाणार याची कल्पनाही लोकांना नव्हती. पुण्यातील परिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे. पुण्याचे पालकमंत्री येथे नसतानाही पुण्यात धरण वाहिलं, अशी टीका राज ठाकरे यांनी पुण्यातील पूरस्थितीवर बोलताना राज्य सरकारवर आणि अजित पवार यांच्यावर केली.
“धरणातील पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात सोडलं जाणार याची कल्पनाही लोकांना नव्हती. त्यामुळे अनेक लोकांच्या घरात पाणी शिरलं. मला वाटतं की राज्य सरकारने या सर्व गोष्टीचा विचार करायला हवा. मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला. मात्र, पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही. गेले अनेक वर्ष हे मी सांगतो आहे त्याचच हे चित्र आहे. प्रत्येकवेळी राज्य सरकारकडून डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाऊन प्लॅनिंग नावाची काही गोष्ट नसते”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
राज ठाकरे पुढे म्हणाले, “शहरात किती गाड्या येत आहेत, किती विद्यार्थी येत आहेत. येणाऱ्या गाड्या पार्क कुठे होणार? लोक राहणार कुठे? या प्लॅनिंगसाठी काही उपायोजना कराव्या लागतात. मात्र, आपल्या कोणत्याही शहरात या उपायोजना राबवल्या जात नाहीत. आपल्याकडे जमीन दिसली की विकायची एवढाच उद्योग सुरु आहे. महानगरपालिकेतील काही अधिकारी आणि राज्य सरकारमधील काही अधिकारी आणि बिल्डर्स यांच्यामाध्यमातून अशी शहर बरबाद होत आहेत”, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
केंद्र सरकार महानगरपालिकांच्या निवडणुका का घेत नाही?
“गेले दोन ते तीन वर्ष केंद्र सरकार महानगर पालिकांच्या निवडणुका घेत नाही. येथे कोणीही नगरसेवक नाही. विधानसभा निवडणुका लागतील तेव्हा आमदार येतील. मग नगरसेवक नसल्यामुळे जबाबदारी कोण घेणार? मग प्रशासनाशी कोणी बालायचं? याची सर्व जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यांनीही लोकांना धीर दिला पाहिजे. बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या लोकांना तुम्ही फुकटची घर देत आहात. पण या राज्यातील लोक आहेत ते भीक मागत आहेत. मग याला काय सरकार चालवणं म्हणतात का?”, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
“आज पुणे शहर हे एक राहिलं नाही. त्याची पाच-पाच शहरं झाली आहेत. एक अधिकारी निलंबित करुन काही होत नाही. पुण्यातील परिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही लक्ष घातलं पाहिजे. सध्या महाराष्ट्रात जे चालू आहे, ते अत्यंत दुर्देवी आहे. महाराष्ट्रात फक्त मतांसाठी राजकारण सुरु आहे. पण हे महाराष्ट्रासाठी चागलं लक्षण नाही. या सर्व गोष्टीचा विचार राजकारण्यांनी केला पाहिजे. मग तुमच्यात काय मतभेत असतील किंवा काय मतदान करुन घ्यायचं असेल ते करा. पण अशा प्रकारे जाती-जातीमध्ये विष कलवून जर मतदान मिळवत असताल तर महाराष्ट्राचं भविष्य चांगलं नाही”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
© IE Online Media Services (P) Ltd