पुणे : सिंहगड रस्ता परिसरात तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. खून झालेला तरुण कोंढव्यात राहायला आहे. त्याचा खून वैमनस्यातून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी चार ते पाच जणांविरुद्ध रात्री उशिरा सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत.
तौकीर रफीक शेख (वय २३, रा. मक्का मशिदीजवळ, कोंढवा) असे खून झालेल्याचे नाव आहे. तौकीरविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तौकीर आणि त्याचा मित्र सोमवारी दुपारी वडगाव बुद्रुक परिसरात आले होते. एका इमारतीच्या पार्किंगमध्ये ते गप्पा मारत होते. त्यावेळी चार ते पाच हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. तौकीरच्या डोक्यात कुंडी घातली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तौकीरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.
परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. तौकीर याचा खून वैमनस्यातून झाल्यााची शक्यता आहे. पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. सीसीसीटीव्ही चित्रीकरणात संशयित आढळून आले, अशी माहिती पोलीस निरीक्षक दाईंगडे यांनी दिली.
