पुणे : राज्य मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याविरोधातील आंदोलनाला मुस्लीम सत्यशोधक मंडळाने पाठिंबा जाहीर केला आहे. त्रिभाषा सूत्राचा आधार घेऊन पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचे राज्य शासनाचे धोरण अशास्त्रीय, अनाठायी, आक्रमणकारी आणि मातृभाषा अध्ययनात गोधळ निर्माण करणारे असल्याने मुस्लीम सत्यशोधक मंडळ पूर्वप्राथमिक शिक्षणात हिंदीचा समावेश करण्याच्या धोरणाविरूद्ध असल्याची स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे.
मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी या बाबत प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली. हिंदी भाषेचा समावेश अनिवार्य नसून ऐच्छिक आणि मौखिक स्वरूपात असल्याचे सांगण्यात येते. हिंदी ऐवजी अन्य भाषा शिकण्याची अटी-शर्तीसह सोय उपलब्ध करण्यात येईल, असेही समर्थन राज्य शासन करीत आहे.
सध्या पाचवीपासून त्रिभाषा सूत्राचे अनुचालन असताना, कोणताही शास्त्रीय आधार किंवा जनाधार नसताना राज्य शासन आपल्या निर्णयावर का अडून बसले आहे हे अनाकलनीय आहे. बालवयात मराठी तथा मातृभाषा अधिक समृद्ध केल्यास अन्य भाषा किंवा कोणताही विषय शिकण्यास सोपे जाते हे सर्वमान्य सत्य आहे, असे नमूद करण्यात आले आहे.
मुस्लीम सत्यशोधकने मराठी भाषेचा प्रचार, सन्मान आणि स्वीकार करण्याची भूमिका आरंभापासूनच घेतली आहे. मंडळ कोणत्याच भाषेबद्दल द्वेष किवा शत्रूभाव न बाळगता बहुभाषिक शिक्षणाचे स्वागतच करते मात्र पहिलीपासून हिंदी छुप्या पद्धतीने लादण्याच्या धोरणाचा विरोध करते. मराठी भाषेच्या समर्थनार्थ आणि पहिलीपासून हिंदीच्या विरोधात साहित्य, समाज, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर विरोध करीत आहेत. तसेच जनआंदोलनही उभे राहिले आहे. मुस्लीम सत्यशोधक मंडळ या आदोलनास पाठिंबा जाहीर करीत आहे. तसेच शासनाने लोकभावनेची दखल घेऊन आपल्या धोरणाचा फेरविचार करावा असे आवाहन करीत आहे, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.