पुणे : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार राष्ट्रीय पातळीवर करण्याची अजित पवार यांची इच्छा आहे. त्यासाठी छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याच्या खांद्यावर राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी दिली जाईल, असे मला स्वत: अजित पवार यांनी सांगितले होते. मात्र, भुजबळ यांच्या मनात काही वेगळे होते. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला असून, तिन्ही पक्षांचे नेते बसून त्यावर योग्य तो तोडगा काढू,’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीसंदर्भात दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्याच्या मंत्रिमंडळात ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यावरून भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर ओबीसी समाजानेही आक्रमक भूमिका घेतली होती. त्यातच भुजबळ यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे भुजबळ यांची पुढील भूमिका काय असेल, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी भुजबळ यांची नाराजी दूर केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> अपघातस्थळी अजित पवार यांची भेट, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत देण्याचा निर्णय

फडणवीस म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात न घेता डावललेले नाही. भुजबळ यांना राष्ट्रीय स्तरावर पाठवायचे होते. भुजबळ यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. त्यात त्यांना सर्व बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. ते महायुतीचे प्रमुख नेते आहेत. ते राष्ट्रवादीचे असल्याने तेथे त्यांचा सन्मान आहेच. तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या मनातही त्यांच्याविषयी सन्मानाची भावना आहे. अजित पवार यांनाही त्यांची चिंता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय स्तरावर मोठे करायचे आहे. भुजबळ यांना राष्ट्रीय स्तरावर पाठवायचे आहे, असे अजित पवार यांनी मला सांगितले होते.’

हेही वाचा >>> वाघोलीतील घटनेची पुनरावृत्ती टळली; मावळमध्ये भरधाव टेम्पो पलटी, मद्यधुंद चालकाला बेड्या

दरम्यान, पालकमंत्रिपदाबाबत मंत्रिमंडळात कोणतेही स्पर्धा नाही. महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांना याबाबत जबाबदारी दिली आहे. हे नेते एकत्र बसतील. येत्या दोन-तीन दिवसांत त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता येत्या सात ते आठ दिवसांत वितरित केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

राहुल गांधींची परभणी भेट राजकीय हेतूने

‘परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केवळ राजकीय हेतूने ही भेट घेतली आहे. लोकांमध्ये, जाती-जातींमध्ये द्वेष पसरविण्याचे काम ते करीत आहेत. राज्य सरकार संवेदनशील असल्याने याप्रकरणी न्यायालयीन चौकशीचा आदेश दिला आहे. त्यातून सर्व सत्य बाहेर येईल. चौकशीत कुठल्याही प्रकारे, तसेच मारहाणीत हा मृत्यू झाल्याचे आढळल्यास कोणालाही सोडले जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. शरद पवार यांनीही मला यात लक्ष घालण्यास सांगितले असून, त्यांना मी यात पूर्ण लक्ष घातले असल्याचे सांगितले आहे,’ असे ते म्हणाले.

अजित पवारांची सावध भूमिका

‘ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्याबाबतची बाब पक्षांतर्गत आहे. ती पक्ष पातळीवर सोडविली जाईल,’ असे सांगून उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भुजबळ यांच्याबाबत सावध भूमिका घेतली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National level responsibility will be given to a leader chhagan bhujbal says cm devendra fadnavis pune print news apk13 zws