पुणे : महाराष्ट्रात बारामतीनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. शरद पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यासाठी कंबर कसल्याने अजित पवार यांना बारामतीनंतर शिरूरमध्ये ही चीत पट करण्यासाठी शरद पवार यांनी मोर्चे बांधणी सुरू केल्याचे बोलले जात आहे. अशा स्थितीत अजित पवार कोणाला उमेदवारी देणार याची चर्चा सुरू असताना भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी आपण शिरूरसाठी इच्छुक असल्याचे आणि आपल्याला उमेदवारी द्यावी असा दावा त्यांनी केला आहे.

विलास लांडे म्हणाले, शिरूरची आगामी लोकसभा लढण्यास इच्छुक आहे. यासाठी अजित पवार यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे. शिरूर लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. गेली अनेक वर्षे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम केलं असून अजित पवार यांच्यासोबत एकनिष्ठ आहे. शिरूर लोकसभेत कामाचा अभाव आहे. मी शंभर टक्के निवडून येणार असा विश्वास विलास लांडे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा : धक्कादायक! पुण्यात उपजत मृत्यू सर्वाधिक, तर बालमृत्यूमध्ये…

विलास लांडे हे भोसरी विधानसभेचे माजी आमदार आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या ते जवळचे असल्याचं सांगितलं जातं. २०१९ ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत विलास लांडे यांची निश्चित झालेली उमेदवारी ऐनवेळी अमोल कोल्हे यांना देण्यात आली होती. यामुळे आगामी शिरूर लोकसभेसाठी विलास लांडे हे तीव्र इच्छुक असून २०१९ ला हुकलेली संधी पुन्हा मिळवायची आहे.