पिंपरी : कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदी विक्री घोटाळ्यावरून चर्चेत आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचा भागीदार, कुलमुखत्यारपत्र असणारी महिला आणि निलंबित सहदुय्यम निबंधकावर बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर राज्य शासनाचे सहा कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क बुडविल्याचा आरोप आहे.

याबाबत सहजिल्हा निबंधक संतोष अशोक हिंगाणे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमेडिया एंटरप्राइजेस कंपनीचे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील, जमीन विक्रीदार कुलमुखत्यारधारक शीतल किशनसिंह तेजवानी आणि सहदुय्यम निबंधक रवींद्र बाळकृष्ण तारू अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४० एकर क्षेत्रफळाची दस्तनोंदणी २० मे २०२५ मध्ये झाली होती. खरेदी-विक्रीचे दस्त करून घेत असताना सहा कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क शासनाला भरणे अपेक्षित होते. परंतु, आरोपींनी आपसात संगनमत करून शासनाची फसवणूक केली. मूळ शेतकऱ्यांनी तेजवाणी यांना जमिनीचे व्यवहार करण्यासाठी कुलमुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अटॉर्नी) दिले होते. त्यामुळे तेजवाणी यांनी या जमिनीची खरेदी लिहून दिली. अमेडिया एलएलपी कंपनीतर्फे दिग्विजय पाटील यांनी ही जमीन लिहून घेतली.

या जमीन मिळकतीच्या सातबारा उताऱ्यावर भोगवटदाराचे नाव मुंबई सरकार असे नमूद आहे. या जमिनीचे मिळकतीचे खरेदी-विक्री दस्त करण्याकरिता सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे आणि सहजिल्हा निबंधक यांनी खरेदीखत करताना लेखी पत्राद्वारे पाच कोटी ८९ लाख ३१ हजार ८०० रुपये मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक असल्याचे कळवले होते. मात्र, आरोपींनी संगनमत करून जमिनीचे खरेदी विक्री दस्त करतेवेळी शासनाला देय असलेले सहा कोटी रुपये मुद्रांक शुल्क न भरता फसवणूक केल्याचे पोलीस उपायुक्त गायकवाड यांनी सांगितले.

या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, यासाठी कागदपत्रांच्या आधारे तपास करण्यात येत आहे. त्यानंतर यामध्ये कोणाचा सहभाग आहे, हे पुढे येईल, असे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले.