पिंपरी-चिंचवडला मिळाला भाजपाचा तिसरा आमदार; कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला

दयनीय अवस्था ते प्रबळ राजकीय पक्ष- पिंपरी-चिंचवडमधील भाजपाचा आठ वर्षांचा प्रवास

MLA Uma Khapre
विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल पिंपरी शहर भाजपच्या वतीने उमा खापरे यांचा पक्ष कार्यालयात सत्कार करण्यात आला.

दयनीय अवस्था ते सध्याचा अतिशय प्रबळ राजकीय पक्ष, अशी भाजपाची गेल्या आठ वर्षातील पिंपरी-चिंचवड शहरातील वाटचाल आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यातील महापालिकेची सत्ता खेचून आणण्याबरोबरच शहरातील तीन पैकी दोन आमदारकीच्या जागा जिंकणाऱ्या भाजपाला उमा खापरे यांच्या माध्यमातून शहरात तिसरा आमदार मिळाला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे.

कार्यकर्त्यांना अधिक जोमाने काम करण्यासाठी पक्षनेतृत्वाने प्रोत्साहित केले –

पिंपरी पालिकेची सत्ता १५ वर्षे राष्ट्रवादीकडे होती. या काळात गटबाजीने पोखरलेल्या भाजपाची अवस्था शक्तीहीन होती. पक्षाचे जेमतेम तीन नगरसेवक होते. तथापि, लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पालिका खेचून आणली. भाजपाचे संख्याबळ तीनवरून ७७ वर जाऊन पोहोचले. त्यानंतर शहरात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी भाजपाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले. अमर साबळे, ॲड. सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे, माऊली थोरात, मोरेश्वर शेडगे, अमित गोरखे आदींना विविध पदे दिली. खापरे यांच्याकडेही महिला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देण्यात आले. ते पद कायम ठेवून पिंपरी पालिका निवडणुकांच्या तोंडावर खापरे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे. एकप्रकारे कार्यकर्त्यांना अधिक जोमाने काम करण्यासाठी पक्षनेतृत्वाने प्रोत्साहित केले आहे.

निगडी ते पिंपरीतील पक्ष कार्यालयापर्यंत उमा खापरेंची मिरवणूक –

शहरात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर डावलण्यात आल्यामुळे हा गट मोठ्या प्रमाणात नाराज झाला होता. मात्र, खापरे यांना ती संधी मिळाल्यामुळे त्या गटासह शहर भाजपामध्ये आनंदाचे वातावरण आहे. आगामी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीशी लढण्यासाठी बळ मिळाल्याची भावना पक्षवर्तुळात आहे. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल गुरूवारी खापरे यांचे शहर भाजपाकडून जोरदार स्वागत करण्यात आले. निगडी ते पिंपरीतील पक्ष कार्यालयापर्यंत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. माजी खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष महेश लांडगे, माजी महापौर माई ढोरे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप आदींनी त्यांचा सत्कार केला.

उमा खापरे यांना पक्षनिष्ठेचे फळ मिळाले –

“उमा खापरे यांना पक्षनिष्ठेचे फळ मिळाले. प्रामाणिकपणे काम केल्याची दखल पक्षनेतृत्वाकडून घेतली जाते. त्यांना मिळालेली संधी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी मार्गदर्शक आहे. खापरे यांच्या माध्यमातून शहराला पहिल्या महिला आमदार मिळाल्या. त्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्त्यांच्या वतीने आभार मानतो. अशा शब्दांमध्ये पिंपरी-चिंचवडचे आमदार व शहाराध्यक्ष महेश लांडगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गोपीनाथ मुंडे यांची खूप आठवण येते –

“मागील २५ वर्षांपासून पक्षासाठी केलेल्या कामाची पावती मिळाली. गोपीनाथ मुंडे यांची छोटी कार्यकर्ती म्हणून त्यांची खूप आठवण येते. आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यासोबत आगामी काळात काम करत राहीन. ” असं आमदार उमा खापरे यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pimpri chinchwad gets third bjp mla the enthusiasm of the workers increased pune print news msr

Next Story
‘एमपीएससी’चा महत्त्वपूर्ण निर्णय : राज्यसेवेची परीक्षा योजना, अभ्यासक्रमामध्ये बदल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी