पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर ३१८ हरकती आणि सूचना आल्या आहेत. शेवटच्या दिवशी २७६ हरकती आल्या. सर्वाधिक हरकती प्रभाग क्रमांक दहा माेरवाडी- -शाहूनगर- संभाजीनगर या प्रभागातून आल्या आहेत. प्रारूप प्रभागरचनेवरून भाजप आणि अजित पवार गटात वादाची ठिणगी पडली आहे. प्रारूप प्रभागरचनेत काेणताही बदल करू नये, अशी भूमिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे, तर प्रभागरचना करताना सीमांचे उल्लंघन केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने केला आहे.

महापालिकेने २२ ऑगस्टला चार सदस्यीय पद्धतीने ३२ प्रभागांची प्रारूप रचना जाहीर केली. प्रारूप प्रभागरचनेचे नकाशे महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले होते. प्रभाग रचनेवर बुधवारपर्यंत ४२ हरकती आल्या होत्या. शेवटच्या दिवशी हरकती नाेंदविण्यासाठी रांग लागली हाेती. दुपारी तीन वाजेपर्यंत २७६ हरकती आल्या. १४ दिवसांत एकूण ३१८ हरकती आल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या, माजी महापौर मंगला कदम यांच्या माेरवाडी-शाहूनगर-संभाजीनगर या प्रभागाच्या रचनेवर सर्वाधिक म्हणजे ११५ हरकती आल्या आहेत. या प्रभागाची रचना करताना नैसर्गिक नाले, महामार्गाच्या सीमा ताेडल्याची हरकत कदम यांनी घेतली आहे.

त्या खालोखाल प्रभाग क्रमांक एक चिखली गावठाण- माेरेवस्ती या प्रभागाबाबत ९८, तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष याेगेश बहल यांचा प्रभाग असलेल्या महेशनगर-संत तुकारामनगर-वल्लभनगर प्रभागाबाबत ३१ हरकती आल्या आहेत.

नऊ प्रभागांबाबत एकही हरकत नाही

नऊ प्रभागांच्या प्रारूप रचनेबाबत एकही हरकत आली नाही. त्यामध्ये प्रभाग क्रमांक ५, १३, १५, १६, १७, १८, २५, २७ आणि २८ या प्रभागांचा समावेश आहे.

मागील वेळीच्या तुलनेत हरकतींचे प्रमाण कमी

प्रारूप प्रभाग रचनेवर २०१७ मध्ये एक हजार ४३० हरकती आल्या हाेत्या. त्यामध्ये तळवडे, चिखली गावठाण, साेनवणे वस्ती, माेरेवस्ती या प्रभाग क्रमांक एकबाबत सर्वाधिक एक हजार २९९ हरकती आल्या हाेत्या. आगामी महापालिका निवडणुकीसाठी २०१७ चीच प्रभाग रचना कायम ठेवण्यात आली आहे. आता केवळ ३१८ हरकती आल्या आहेत.

१२ सप्टेंबरपर्यंत सुनावणीची प्रक्रिया पूर्ण

या हरकतींवर राज्याचे प्रधान सचिव प्रवीण दराडे सुनावणी घेणार आहेत. १२ सप्टेंबरपर्यंत सुनावणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ८ ते १० सप्टेंबर दरम्यान हरकतीवर सुनावणी होणार आहे. हरकती, सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन १३ ते १५ सप्टेंबर दरम्यान अंतिम प्रभागरचना नगरविकास विभागाला सादर केली जाणार आहे. नगरविकास विभागाकडून प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणार आहे. आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतर ३ ते ६ ऑक्टोबर या कालावधीत महापालिका आयुक्त अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करणार आहेत.

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात विसंवाद

सर्वाेच्च न्यायालयाने १० मार्च २०२२ पूर्वीच्या प्रभाग रचनेनुसार निवडणूक घेण्याचे आदेश दिले असल्याचा दावा करून आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचनेत काेणताही बदल करू नये, अशी सूचना भाजपचे विलास मडिगेरी यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वतीने प्रभाग रचना करताना सीमांचे उल्लंघन केल्याचा आराेप करून हरकती घेतल्या आहेत.

प्रभाग रचनेवर ३१८ हरकती आल्या आहेत. अनेक हरकती एकसारख्याच आहेत. या हरकतींवर पुढील आठवड्यात सुनावणी घेण्यात येणार आहे.अविनाश शिंदे,सहायक आयुक्त, निवडणूक विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

प्रभाग रचना करताना नैसर्गिक सीमांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी हरकती घेतल्या आहेत. सुनावणीत याबाबत जोरकसपणे बाजू मांडली जाईल.-याेगेश बहल, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

भाजपच्या दाेन ते तीन पदाधिकाऱ्यांनी हरकत घेतली आहे. त्यांनी प्रभागातील रचनेबाबत सूचना केली आहे.-शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजप