पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट आणि भटक्या श्वानांची समस्या कायम असून मागील तीन महिन्यांत आठ हजार ३३५ जणांना श्वानांनी चावा घेतला आहे. शहरात एक लाखांच्या आसपास भटक्या श्वानांची संख्या असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.

शहरात मोकाट व भटक्या श्वानांची संख्या वाढताना दिसते. रात्रीच्या वेळी वाहने व पादचार्यांवर श्वान धावून जातात. श्वान अचानक अंगावर आल्याने त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी वाहनचालक वाहन वेगात चालवितात. त्यात अपघात होतात. रात्री अंधारात रस्त्यांवरुन जाताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. श्वानाच्या चाव्यामुळे तसेच, अपघात होऊन जखमी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. लहान मुलांवर हल्ला करून चावे घेण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.

मोकाट श्वानांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून मोकाट श्वान पकडून त्याच्यावर नसबंदी (निर्बिजीकरण) शस्त्रक्रिया केली जाते. एका शस्त्रक्रियेसाठी महापालिका एक हजार रुपये खर्च करते. त्यावर वर्षाला कोट्यवधीचा खर्च होत आहे. असे असले तरी, शहरात भटक्या श्वानांची संख्या वाढताना दिसून येत आहे.

मागील नऊ वर्षातील आकडेवारी

पिंपरी-चिंचवड शहरात मागील नऊ वर्षात एक लाख ५० हजार १७६ नागरिकांना श्वानांनी चावा घेतला आहे. त्यात सन…

  • २०१६-१७ दहा हजार ५३३,
  • २०१७-१८ मध्ये १३ हजार ५५८,
  • २०१८-१९ मध्ये १४ हजार ८४२,
  • २०१९-२० मध्ये १२ हजार ७५१,
  • २०२०-२१ मध्ये १३ हजार ८३२,
  • २०२१-२२ मध्ये १३ हजार ८९२,
  • २०२२-२३ मध्ये १८ हजार ५००,
  • २०२३-२४ मध्ये २४ हजार १६९ आणि
  • २०२४-२५ मध्ये २८ हजार ९९

अशा एक लाख ५० हजार नागरिकांना श्नानांनी चावा घेतला आहे. तर, चालू आर्थिक वर्षातील तीन महिन्यात आठ हजार ३३५ जणांना श्वानांनी चावा घेतला आहे.

नेहरूनगर येथील श्वान नसबंदी केंद्रावर पिंजर्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. पशुवैद्यकीय विभागाचे मनुष्यबळ वाढविण्यात येत आहे. पशुवैद्यकीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, लाईव्ह स्टॉक सुपरवाझर, डॉग पिक स्कॉड कुली अशी एकूण १६ पदे भरण्यात आली आहेत. श्वानांची नसंबदी शस्त्रक्रिया वाढविण्यात येत आहे. – संदीप खोत, उपायुक्त, पशुवैद्यकीय विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका.

श्वानाने चाव्या घेतलेल्या नागरिकाला रेबीज प्रतिबंधित लस दिली जाते. यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात जखमींना विनामूल्य लस दिली जाते. या लसीच्या दरवर्षी दहा हजार बाटल्या खरेदी केल्या जातात. रुग्णालयात पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध आहे. – डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका.