पिंपरी : समाजमाध्यमातील व्हॉट्सॲप आणि फोनद्वारे संपर्क साधून कर्ज मंजूर करून देतो असे सांगून एका व्यक्तीकडून कागदपत्रे घेतली आणि त्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या नावाने २७ हजार रुपयांचे कर्ज घेतले. तसेच, पाच लाख रुपयांच्या लोनसाठी प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली २३ हजार ८१४ रुपये ऑनलाइन वळती करण्यास सांगून ३० हजार ५९१ रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली. ही घटना फुगेवाडी येथे घडली.
याप्रकरणी ३३ वर्षीय युवकाने दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲप आणि फोनकॉलद्वारे संपर्क साधून कर्ज मंजूर करून देतो असे सांगितले. फिर्यादीकडून कर्ज मंजुरीसाठी लागणारी कागदपत्रे घेतली. त्यानंतर एका फायनान्स कंपनीचे फिर्यादीच्या नावाने त्यांच्या संमतीशिवाय २७ हजार रुपयांचे कर्ज घेतले.
पाच लाख रुपयांच्या कर्जासाठी २३ हजार ८१४ रुपयांची प्रक्रिया शुल्क भरण्याचे प्रलोभन दाखवले आणि ते शुल्क फिर्यादीच्या खात्यावर पाठवून ५.२५ लाखांचे कर्ज मंजूर करून देतो, असे सांगितले. त्याने फिर्यादीला २३ हजार ८१४ रुपयांचे प्रक्रिया शुल्क एका अनोळखी स्कॅनरवर पाठवायला भाग पाडले. फिर्यादीची ३० हजार ५९१ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. दापोडी पोलीस तपास करत आहेत.
फसवणूक करून कंत्राटदाराला ८६ लाखांना गंडा
एका बांधकाम कंपनीच्या प्रतिनिधीने विद्युत कामाचे बिल कंपनीच्या खात्यावर जमा झाल्यानंतर कंत्राटदाराला उर्वरित ८६ लाखांहून अधिक रक्कम न देता त्याची आर्थिक फसवणूक केल्याची ही घटना पिंपळे गुरव येथे घडली. या प्रकरणात ५० वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला भोसरी बापूजी बुवा चौक ते पी.एम.टी. चौकापर्यंतच्या रस्त्याच्या विद्युतविषयक कामाची वर्क ऑर्डर दिली होती. फिर्यादीने हे काम वेळेत पूर्ण केले आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनेही पूर्णत्वाचा दाखला दिला. त्यानंतर फिर्यादीने केलेल्या कामाच्या खर्चाची बिले महापालिकेत जमा केली. या बिलांची एकूण रक्कम एक कोटी ९९ लाख ९३ हजार १४५ रुपये ही बांधकाम कंपनीच्या बँक खात्यावर जमा झाली.
परंतु, कंपनीने फिर्यादीला केवळ ६३ लाख १२ हजार ४२३ रुपये देऊन त्यांची उर्वरित ८६ लाख ४४ हजार २१९ रुपये रक्कम दिली नाही. फिर्यादीने आरोपीकडे उर्वरित रक्कमेबाबत विचारणा केली असता, आरोपीने ‘तू जीएसटी वेळेवर भरला नाहीस, मी तुझी रक्कम तुला देणार नाही, तुला काय करायचे ते कर व माझी कोठेही तक्रार कर मी कोणालाही घाबरत नाही’ अशी धमकी देऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली. सांगवी पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण
मित्राला मारहाण होत आल्याने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केल्याने राग मनात धरून तीन जणांनी एका तरुणाला लाकडी दांडका, कटर आणि चॉपरने मारहाण केली. ही घटना अंकुश चौक, निगडी येथे घडली.
या प्रकरणात २३ वर्षीय तरुणाने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मित्राला आरोपी मारहाण करत असताना फिर्यादी त्याला सोडवण्यासाठी गेले. त्याचा राग मनात धरून आरोपीने लाकडी दांडक्याने, कटर, चॉपरने फिर्यादीच्या डाव्या हातावर, पाठीवर व डाव्या बाजूला कंबरेला मारहाण करून जखमी केले. तसेच, शिवीगाळ करत दमदाटी केली. निगडी पोलीस तपास करत आहेत.
रागाने बघितल्याच्या वादातून मारहाण
रागाने बघितल्याच्या कारणावरून एका व्यक्तीने वाद घालून मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादीने प्रतिकार केल्याने त्याने इतर चार साथीदारांना बोलावून जमाव जमवून लाकडी दांडक्याने आणि कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बावधन येथे घडली.
या प्रकरणी ३४ वर्षीय व्यक्तीने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीकडे रागाने बघत होता. फिर्यादीने त्याला तुम्ही रागाने का पाहता, असे विचारले असता आरोपीला त्याचा राग आला. त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.
फिर्यादीने प्रतिकार केल्यानंतर आरोपीने त्याच्या इतर चार साथीदारांना बोलावले. त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादीला लाकडी दांडक्याने आणि कमरेच्या पट्ट्याने मारहाण करून जखमी केले व मारण्याची धमकी दिली. बावधन पोलीस तपास करत आहेत.
भाजी मार्केटमध्ये मुलाच्या गळ्यातील सोन्याचे बदाम हिसकावले
भाजीपाला मार्केटमध्ये पत्नी मुलांसह भाजीपाला खरेदी करत असताना एका रिक्षाचालकाने मुलाच्या गळ्यातील २५ हजार रुपये किंमतीचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे बदाम काळ्या दोऱ्यातून हिसकावले आणि चोरी करून पळून जात असताना बाजारातील लोक आणि गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले. ही घटना किवळेतील भाजीपाला मार्केट येथे घडली.
याबाबत दत्तात्रय रामदार बेलकर (४१, किवळे) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी कैलास शामराव खाडे (२६, निगडी, ता. हवेली) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची पत्नी मुलासह किवळे येथील भाजीपाला मार्केटमध्ये भाजी खरेदी करत असताना, आरोपी कैलास खाडे याने फिर्यादीच्या मुलाच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे बदाम लबाडीच्या इराद्याने हिसकावले. चोरी करून पळून जात असताना बाजारातील लोक आणि गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्याला जागीच पकडले. देहुरोड पोलीस तपास करत आहेत.
पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकास अटक
एका तरुणाने बेकायदेशीरपणे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगले. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमाटणे फाटा येथे घडली. याबाबत पोलिस शिपाई गणेश सावंत यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी अजय गुलाब साळुंके (२३, नेरे दत्तवाडी, मुळशी) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजय साळुंके याच्याकडे ५२ हजार रुपये किमतीचे एक लोखंडी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नव्हता. त्याने ती अवैधरित्या बाळगली असताना तो पोलिसांना मिळून आला. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.