लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला भरभरून मतदान होते. मात्र, तेच मतदार पालिका निवडणुकीत शिवसेनेकडे पाठ फिरवतात. मोठ्या निवडणुका व स्थानिक निवडणुकीत शिवसेनेला वेगवेगळा कौल मिळतो, ही परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून आहे. खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यासारखे ताकदीचे नेतेही आता पक्ष सोडून गेले. ते असतानाच पक्षाचे तीन तेरा वाजले होते. आता त्यांच्याशिवाय पालिका निवडणुकांना सामोरे जाताना काय चित्र असेल, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक झालेले आहेत. शहरात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे, याचा प्रत्यय लोकसभा व विधानसभा निवडणुकीत येतो. मावळ लोकसभेतून शिवसेनेचे गजानन बाबर (२००९) व नंतर श्रीरंग बारणे (२०१४ आणि २०१९) खासदार म्हणून निवडून आले. दोघांनाही पिंपरी-चिंचवडकरांनी चांगले मताधिक्य दिले. भोसरी विधानसभेचा समावेश असलेल्या शिरूर लोकसभेत शिवाजीराव आढळराव यांच्या बाबतीतही तोच अनुभव आहे. आढळरावांना प्रत्येकवेळी भोसरीने मोठे मताधिक्य दिले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून आढळराव पराभूत झाले. तरीही भोसरी विधानसभेतून त्यांना ३७ हजारांचे मताधिक्य होते.

विधानसभा निवडणुकीत थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती राहिली आहे. पिंपरी विधानसभेतून २०१४ ला शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार निवडून आले होते. तर, २०१९ मध्ये ते दुसऱ्या स्थानावर राहिले. २०१४ च्या निवडणुकीत चिंचवड विधानसभेत शिवसेनेचे राहुल कलाटे दुसऱ्या स्थानावर राहिले. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी लाखाहून अधिक मते घेतली. भोसरी विधानसभेतून शिवसेनेच्या सुलभा उबाळे दोन वेळा दुसऱ्या स्थानावर राहिल्या आहेत.

महापालिका निवडणुकांवेळी वेगळीच परिस्थिती –

महापालिका निवडणुकांवेळी वेगळीच परिस्थिती दिसते. दोन आकडी संख्या गाठताना शिवसेनेची दमछाक होते. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे जेमतेम नऊ नगरसेवक निवडून आले होते. भोसरी मतदारसंघातील ४२ जागांपैकी एकाही जागेवर शिवसेनेला विजय मिळवता आला नाही.

पालिकेवर भगवा फडकणार कसा? –

आगामी निवडणुकांना सामोरे जात असताना शिवसेनेतील परिस्थितीत सकारात्मक म्हणता येईल, असा बदल दिसत नाही. याउलट, बारणे, आढळराव यांच्यासारखे ताकदीचे नेते पक्ष सोडून गेले आहेत. गजानन बाबर यांचे निधन झाले. याशिवाय, पक्षाचे स्थानिक नेते गटबाजीच्या विळख्यात अडकलेले आहेत. अनेक जण भाजपच्या तथा राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. तुलनेने नवख्या असलेल्या सचिन भोसले यांच्याकडे पक्षाची धुरा आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही पक्षाचे नेते पिंपरी पालिकेवर भगवा फडकवा, असे आवाहन सातत्याने करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri large scale voting for mp mla election but voters ignore shiv sena in municipal elections pune print news msr