पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार यादीतील दुबार मतदारांची नावे ओळखून त्यांच्या नावापुढे दुबार मतदार अशी नोंद करण्यात येणार आहे. तसेच दुबार मतदार मतदानासाठी आल्यास अन्य कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याचे हमीपत्र त्याच्याकडून घेण्यात येणार आहे. आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही दिवसांमध्ये होणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विधानसभे निवडणुकीतील मतदार यादी वापरण्यात येणार आहे. मात्र, यामध्ये आढळणाऱ्या दुबार नावांच्या त्रुटी दूर करण्यासाठी विशेष कार्यप्रणाली निश्चित करण्याचे आदेश राज्य निवडणुक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हा निवडणूक शाखेकडूनही त्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.
अनेक वेळा एकाच मतदाराचे नाव एकापेक्षा जास्त ठिकाणी किंवा एकाच ठिकाणी दोनदा (दुबार) नोंदवले जाते. दुबार नावांमुळे निवडणुकीच्या वेळी बनावट मतदानाची शक्यता असून आणि यादीची विश्वासार्हता कमी होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने संभाव्य दुबार नावे आढळल्यास अनुसरावयाच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर आदेश सर्व महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही जिल्हा निवडणूक शाखेकडून करण्यात येणार आहे.
दुबार मतदारांची माहिती होण्यासाठी अधिकाऱ्यांना ऑनलाईन ॲक्सेस दिला असून त्यानुसार त्यांना संकेतस्थळावर दुबार मतदारांची यादी मिळणार आहे. संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर डबल स्टार असे चिन्ह नमूद करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवर तपासणी करून ती खरोखरच एकाच व्यक्तीची आहे किंवा वेगळी व्यक्ती आहे, याची खातरजमा केली जाणार आहे.
दरम्यान, दुबार मतदारांना दोन पैकी कोणत्या वॉर्डात मतदान करणार आहे, याची माहिती अधिकाऱ्यांना आधी द्यावी लागणार आहे. ज्या ठिकाणी मतदान करणार आहे, त्याबाबतचे पत्र संबधित दुबार मतदारांकडून घेतले जाणार आहे. त्या मतदाराला त्याच मतदान केंद्रांवर मतदान करता येणार आहे. अन्य मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही.
दुबार मतदाराने कोणत्या वॉर्डमध्ये मतदान करणार आहे, याची माहिती दिली नसल्यास असा दुबार मतदार मतदानासाठी मतदान केंद्रावर आल्यास ज्या दुबार मतदाराकडून अन्य कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबतचे हमीपत्र घेतले जाणार आहे. हमीपत्र घेताना त्यामध्ये ‘मी नेमून दिलेल्या मतदान केंद्राशिवाय इतर कोणत्याही मतदान केंद्रांवर मतदान करणार नाही. जर या नियमांचे उल्लंघन झाल्यास निवडणूक अधिनियमातील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र असेल, याची मला पूर्ण जाणीव आहे,’ अशा आशयाचे हमीपत्र घेतले जाणार आहे
