पुणे : प्रधानमंत्री ई-ड्राईव्ह योजनेंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) एक हजार ‘ई-बस’ खरेदी करण्यास केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली आहे. मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी या प्रस्तावाला मंजुरी दिली. ‘लवकरच पीएमपीच्या ताफ्यात या बस दाखल होणार असून, पुण्याची सार्वजनिक वाहतूक प्रदूषणमुक्त आणि गतीमान होण्यास मदत होईल,’ अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुणे, पिंपरी चिंचवड, उपनगर ते पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडी) हद्दीपर्यंत पीएमपी धावते. सध्या ताफ्यात दोन हजार पीएमपी असून, त्यातील सुमारे ७५० स्वमालकीच्या आहेत, तर उर्वरित ठेकेदारांच्या आहेत. पुणे, पिंपरी चिंचवडचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेता किमान तीन हजार पीएमपी आवश्यक आहे.

पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी पीएम ई-ड्राइव्ह योजनेंतर्गत एक हजार बस देण्याबाबत जाहीर करण्यात आले होते. सुमारे दीड ते दोन वर्षांपासून या ई-बसची प्रतीक्षा असून, प्रशासकीय पातळीवर सातत्याने बैठका, पाठपुरावा सुरू होता. विशेषतः राज्य सरकारकडूनही आर्थिक तरतुदीबाबत चाचपणी करून हालचाली सुरू होत्या.

मोहोळ म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सहमती दर्शवून अर्थपुरवठ्याबाबत रिझर्व्ह बँकेला पत्र पाठविण्यात आले आहे. तसेच, पीएमपी प्रशासनामार्फत या ‘ई-बस’साठीचा प्रस्ताव केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. एच. डी. कुमारस्वामी यांनी या प्रस्तावाला गती देऊन मंगळवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्तावाला मान्यता दिली. त्यामुळे पीएमपीच्या एक हजार ई-बसचा मार्ग मोकळा झाला आहे.’

शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम आणि गतिमान करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारकडून मदत मिळत असल्याचेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.

‘मेट्रोलाही गती मिळणार’

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशकडून (महामेट्रो) पुणे, पिंपरी चिंचवड शहरांबरोबर उपनगरांपर्यंत मेट्रो मार्गांचा विस्तार करण्यात येत आहे. मात्र, ज्या ठिकाणी मेट्रो मार्ग नाही, त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांसाठी पूरक (फिडर) सेवा विस्तार सुरू केला आहे. सध्या शहरात २३ ठिकाणी पूरक सेवा सुरू करण्यात आली आहे. पूरक सेवेला ३० टक्केच प्रतिसाद मिळत असल्याचे अभ्यासातून समोर आले होते. पीएमपीच्या ताफ्यात नवीन बस दाखल झाल्यास दळणवळ सुविधा आणखी वाढविण्यात येणार असून पीएमपी ते मेट्रो स्थानक असा सुलभ प्रवास सुरू करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

‘पीएमपी’चा आढावा

  • एकूण बस संख्या – २,०४९
  • इलेक्ट्रिक बस – ४९०
  • सीएनजी-डिझेल बस – १,५३३
  • स्व:मालकीच्या बस – ७४८
  • भाडतत्त्वावरील बस – १,२७५