पुणे : पुण्यात नवीन सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, राज्य सरकारकडे लवकरच हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. ससून प्रशासनाने तो तयार केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ससून सर्वोपचार रुग्णालयावरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या विशिष्ट आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ससूनमधील इन्फोसिस इमारतीत सुपर स्पेशालिटी सुविधा आहे. ही सुविधा अपुरी पडू लागल्याने स्वतंत्र रुग्णालयाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार, रुग्णालयाची क्षमता अडीचशे रुग्णशय्यांची असेल. याचबरोबर या ठिकाणी स्वतंत्र अतिदक्षता विभाग असेल आणि त्यात ५० रुग्णशय्या असतील. मेंदूविकार, मूत्रविकार, हृदयविकार आणि प्लास्टिक शस्त्रक्रिया हे विभाग या रुग्णालयात असतील. अनेक रुग्णांना सध्या उपचारांसाठी प्रतीक्षा करावी लागते. नवीन सुपर स्पेशालिटी रुग्णालय झाल्यानंतर रुग्णांचा हा प्रतीक्षा कालावधी कमी होणार आहे.

हेही वाचा >>>पिंपरी : उद्योजकांमागे ‘एलबीटी’चे शुक्लकाष्ट, महापालिकेकडून ७२ हजार व्यापाऱ्यांना नोटिसा

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात मेंदूविकार, हृदयविकार, मूत्रविकार आणि प्लास्टिक शस्त्रक्रिया या विषयांचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्गही सुपर स्पेशालिटी रुग्णालयात घेतले जातील. या रुग्णालयासाठी डॉक्टर, परिचारिकांसह इतर मनुष्यबळाचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा प्रस्ताव लवकरच ससून प्रशासनाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कर्करुग्णालयासाठी लवकरच बैठक

‘पुण्यात स्वतंत्र कर्करुग्णालय उभारण्याचाही प्रस्ताव आहे. या रुग्णालयाच्या जागेबाबत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत जागेवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर कर्करुग्णालयाचा अंतिम आराखडा तयार केला जाईल. तो आराखडा राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल,’ अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांनी दिली.

ससूनमधील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच वेळी सुपर स्पेशालिटी सुविधेवरील ताणही वाढू लागला आहे. त्यामुळे नवीन सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा प्रस्ताव आहे. लवकरच हा प्रस्ताव आम्ही सरकारकडे सादर करणार आहोत.- डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय

भविष्याचा विचार करून ससूनमध्ये नवीन सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची गरज आहे. रुग्णालय प्रशासनाकडून याबाबतचा प्रस्ताव तयार केला जात आहे. त्यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल.- राजीव निवतकर, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण विभाग

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Proposal to set up a new super specialty hospital in pune print news stj 05 amy