पुणे : श्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्टतर्फे नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून यंदा भाविकांना पार्किंग मैदानापासून मंदिरापर्यंत येण्यासाठी प्रथमच ई-रिक्षांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरु असून, सभामंडपाचे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. हा नवीन सभामंडप पूर्वीच्या सभामंडपाच्या दुप्पट मोठा असून भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता येईल.
‘चतुःशृंगी मंदिरात सोमवारी (२२ सप्टेंबर) सकाळी साडेआठ वाजता मंदिर व्यवस्थापक विश्वस्त रवींद्र अनगळ यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. त्यानंतर अभिषेक, रुद्राभिषेक, महावस्त्र अर्पण आणि महापूजा होईल. दररोज सकाळी दहा आणि रात्री आठ वाजता महाआरती होणार आहे. नऊ दिवस मंदिरामध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. ७२ भजनी मंडळांकडून मंदिरात भजन सादर होणार आहे. भाविकांना देवीचे व्यवस्थित दर्शन घेता येईल यादृष्टीने रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.’, अशी माहिती ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त श्रीकांत अनगळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस, निमलष्करी दल, सुरक्षारक्षक आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी अनिरुद्ध सेवा केंद्राचे १५० स्वयंसेवक असतील. यासह कार्डियाक रुग्णवाहिकेसह २४ तास वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे. दसऱ्याच्या दिवशी (२ ऑक्टोबर) सीमोल्लंघनाची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. पालखी मिरवणुकीत ढोल-ताशा वादन होणार असून पालखीवर हेलिकाॅप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे, असे श्रीधर अनगळ यांनी सांगितले.
नवरात्रोत्सवातील कार्यक्रम
- सुयोग मित्र मंडळाच्या वतीने निवारा वृद्धाश्रमातील महिलांसाठी २७ सप्टेंबर रोजी ‘आजीबाईंचा भोंडला’
- १ ऑक्टोबर रोजी नवचंडी होम
निर्माल्यापासून खत निर्मिती
उत्सवकाळात मंदिरात देवीला अर्पण करण्यात येणाऱ्या फुलांपासून (निर्माल्य) खत निर्मिती करण्यात येणार आहे. ग्रीन हिल्स समूहाच्या सहकार्याने मंदिरामागील डोंगरावर वृक्षलागवड करण्यात आली असून, हे खत या झाडांच्या देखभालीसाठी वापरण्यात येणार आहे.
भाविकांसाठी या सुविधा
- पॉलिटेक्निक मैदानावर वाहने लावण्याची विनामूल्य सोय, मैदानापासून मंदिरापर्यंत प्रथमच ई-रिक्षा आणि गोल्फ कार्ट सेवा उपलब्ध
- दर्शनासाठी www.chatushrungidevi.com या संकेतस्थळावर सशुल्क ऑनलाईन पास उपलब्ध