पिंपरी : अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर कंपनी आली असतानाच अचानक बसने पेट घेतला. चालकाने बसमधून उडी मारली. चालकाच्या केबिनमधून आगीच्या ज्वाला दिसताच मी बसच्या दरवाजातून उडी मारली. मागील आसनावर बसलेल्या सहकाऱ्यांचा फोडलेला टाहो…, ‘वाचवा…वाचवा’च्या किंकाळ्या काही क्षणात थांबल्या. या दुघर्टनेत मी बचावलो असलो तरी माझे मरणच मी डोळ्यांसमोर पाहिले, असे सांगत दुर्घटनेत बचावलले विठ्ठल दिघे यांना हुंदका आवरता आला नाही. या धक्क्यातून मी लवकर बाहेर येईल, असे वाटत नाही, असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.
भूगाव येथे पत्नी आणि मुलासोबत राहणारे विठ्ठल दिघे हे २०१० पासून व्योम ग्राफिक्स या कंपनीत कामाला आहेत. ते ‘स्टोअर किपर’ म्हणून काम करतात. कंपनीच्या बसमधून ते दररोज ये-जा करतात. वारजे येथून कामगारांना घेऊन बस सकाळी साडेसहा वाजता निघते. दिघे हे सात वाजता चांदणी चौकात बसमध्ये बसतात. पावणेआठ वाजता बस कंपनीत पोहोचते. बुधवारी नेहमीप्रमाणे दिघे सकाळी बसमध्ये बसले. इतर सहकाऱ्यांसमवेत गप्पा मारत त्यांचा प्रवास सुरू होता.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर कंपनी आली असताना अचानक बसने पेट घेतला. बसने पेट घेतलेला आमच्या लक्षातच आले नाही. चालकाने बसमधून उडी मारल्यानंतर बस रस्ता दुभाजकाला जाऊन धडकली. त्यानंतर आग लागल्याचे आमच्या लक्षात आले. जीव वाचविण्यासाठी सर्वांनीच बसच्या पुढील दरवाजाकडे धाव घेतली. मंजिरी, विश्वास, प्रदीप यांच्यासह मीसुद्धा दरवाजातून खाली उडी मारली.

आमच्या मागोमाग जखमी अवस्थेतील सहकाऱ्यांनीही जिवाच्या आकांताने बसच्या बाहेर धाव घेतली. आम्ही बसबाहेर पडताच काही क्षणात पूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. काही मिनिटांपूर्वी सोबत असलेल्या सहकाऱ्यांचा जिवाच्या आकांताने फोडलेला टाहो माझ्या कानी पडत होता. त्यांचा ‘वाचवा…वाचवा’च्या किंकाळ्यांचा आवाज येत होता. पण, पूर्णपणे आगीच्या कवेत असलेल्या बसकडे बघण्याशिवाय मी काही करू शकलो नाही. मदतीचा टाहो फोडणाऱ्या सहकाऱ्यांचा आवाजही काही क्षणात थांबला.

या दुर्घटनेतून मी वाचलो. मात्र, माझे जिवाभावाचे सहकारी गमावले. या धक्क्यातून मी लवकर बाहेर येईल, असे वाटत नाही. माझे मरण मी डोळ्यांसमोर पाहिले, असे म्हणत दिघे यांनी आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली.

‘मी बोलण्याच्या मन:स्थितीत नाही’

या दुघर्टनेतून बचावलेल्या मंजिरी आडकर या महिलेनेही बसमधून उडी मारून जीव वाचवला. ‘बसमधून उडी मारल्याने माझ्या कमरेला मार बसला आहे. मी रुग्णालयात दाखल आहे. या घटनेमुळे धक्का बसला असून मी बोलण्याच्या मन:स्थितीत नाही’ असे आडकर म्हणाल्या.

नातलगांच्या आक्रोशाने शवागृहही गहिवरले

मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात आणण्यात आले. पोलिसांनी मृतांच्या नातेवाइकांना रुग्णालयात बोलावून घेतले. सुभाष भोसले यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा भाऊ गेला असता, त्यांच्या भावाने भावाचा जळालेल्या अवस्थेतील चेहरा पाहून शवविच्छेदनगृहातच मोठ्याने टाहो फोडला. दररोज डोळ्यांसमोर असणारा चेहरा आज ओळखूही न येण्याच्या अवस्थेत समोर पाहून मृतांच्या नातेवाइकांनी ओळख पटविताना अक्षरश: हंबरडा फोडला. नातेवाइकांच्या आक्रोशाने उपस्थितांनाही गहिवरून आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune company bus fire 4 died survivor vitthal dighe shares his experience of accident and death pune print news ggy 03 css