महापालिका निवडणूक जवळ आल्याने प्रत्येक पक्ष तयारीला लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार हे ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’च्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधत पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन जेवणाचा आस्वाद घेत आहेत. त्यातून ‘ राष्ट्रवादी’ या परिवाराचे मिलन घडवून आणत आहे. मात्र, परिवाराचे मिलन घडवून आणताना पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील कटुता दूर करून ‘मना’चे मिलन घडवून आणण्याचे आव्हान या पक्षापुढे उभे राहिले आहे. पक्षातील सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी पवार यांनी नवीन पदे निर्माण केल्यानंतर आता कोणी कोणाचे ऐकायचे, असा यक्षप्रश्न ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पडला आहे.

महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाचा विस्तार आणि संघटन बळकट करण्यासाठी पुण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी त्यांनी सत्तेचे केंद्रीकरण न करता विकेंद्रीकरणाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांनी पुण्यात दोन शहराध्यक्ष आणि चार कार्याध्यक्ष नेमले आहेत. पूर्व भागाचे शहराध्यक्ष माजी आमदार सुनील टिंगरे, पश्चिम भागासाठी माजी नगरसेवक सुभाष जगताप, कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक अक्रुर कुदळे, माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे आणि हाजी फिरोज शेख यांची नेमणूक करण्यात आली आहे.

अधिक पदे निर्माण करून पक्षवाढीचा नवीन पायंडा पक्षाने घालून दिला आहे. पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी पारंपरिक पद्धती बाजूला करून त्यांनी हा वेगळा मार्ग स्वीकारला आहे. निर्णयप्रक्रियेत अधिक नेत्यांना सहभागी करून पक्षाची ध्येयधोरणे नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा त्यामागील त्यांचा उद्देश आहे.

प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी दिलेल्या विभागावर लक्ष केंद्रित केल्यास पक्षवाढीला चालना मिळेल, असा कयास बांधून ही नवीन रचना तयार करण्यात आली आहे. मात्र, वास्तव चित्र निराळे झाले आहे. कोणी कोणाचे ऐकायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातून मतभेदांची ठिणगी पडू लागली आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण हे चांगल्या उद्देशाने करण्यात आले असले, तरी पदाधिकाऱ्यांंमध्ये मतभेद आणि मनभेद प्रकर्षाने जाणवू लागला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आता त्याचा भडका उडण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पावले उचलावी लागणार आहेत.

महापालिकेची अंतिम प्रभागरचना जाहीर झाली. त्यामध्ये भाजपने त्यांना हवे तेच करून घेतले. अजित पवार यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा करूनही फारसा फरक पडला नाही. ‘राष्ट्रवादी’चे समाधान करण्यासाठी किरकोळ स्वरूपाचे बदल प्रभागरचनेत करण्यात आले. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’ला फार फायदा होईल, असे चित्र दिसत नाही. त्यामुळे इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ही अस्वस्थता इच्छुकांकडून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली जात आहे. मात्र, प्रभागरचनेवरून कोणतीही उघड नाराजी किंवा प्रतिक्रिया व्यक्त करत नसल्याने इच्छुक संभ्रमावस्थेत पडले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी परिवार मिलनाला पुणे जिल्ह्यापासून सुरुवात केली. गेल्या महिन्यात त्यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये दौरा करून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या; तसेच काही पदाधिकाऱ्यांच्या घरी भोजन केले. या मतदारसंघातील हॉटेल, दुकाने यांना भेट देऊन नागरिकांशी मनमोकळ्या गप्पाही मारल्या. त्या वेळी नागरिकांनी त्यांच्याकडे नागरी प्रश्नांबाबत तक्रारीही केल्या. या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी जनसंवाद आयोजित करून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांचे प्रश्न जागेवरच सोडविण्याचा उपक्रमही राबविला.

राष्ट्रवादी परिवार मिलनाला प्रतिसाद मिळत असल्याने दुसऱ्या टप्प्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी हा उपक्रम राबवला. या दोन्ही टप्प्यांमध्ये अजित पवार यांच्या या परिवार मिलनाला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये मात्र अद्याप मिलन होत नसल्याचे दिसून येत आहे. पवार हे राष्ट्रवादी परिवार मिलनाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असताना सर्वच पदाधिकाऱ्यांमध्ये मिलन झाल्याचे भासविले जाते. मात्र, त्यानंतर एकजुटीने पक्षवाढीसाठी फारसे प्रयत्न होत असल्याचे दिसत नाही. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांमध्ये मनोमिलन घडवून आणण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकमेकांशी संवाद साधता यावा, यासाठी पक्षाने वाकडेवाडी येथे शहर कार्यालय थाटले आहे. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागापासून हे कार्यालय दूर असल्याने त्या ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा फारसा राबता नसतो. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी सातत्याने बैठका घेणे आवश्यक झाले आहे. मात्र, प्रमुख पदाधिकाऱ्यांमधील संवादाच्या अभावामुळे बैठका होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’च्या या परिवारात ‘मना’चे मिलन केव्हा होईल, हाच खरा प्रश्न आहे.

sujit.tambade@expressindia.com