पुणे : राज्य सरकारतर्फे धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आता ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. शिवाय स्वतंत्र ॲप्लिकेशनची निर्मितीही केली जाणार असून, त्यासाठी ४८ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्यात भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना राबवण्यात येते. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुसूत्रता आणण्यासह योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या शाळांचा दर्जा, गुणांकन आणि शाळेतील सोयीसुविधा यांची तुलना करून विद्यार्थ्यांना नामांकित शाळेची निवड करणे सुलभ होणे, विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची प्रकिया सुलभ व्हावी, विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा अधिक परिणामकारक, पारदर्शक होण्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळातर्फे (महाआयटी) ऑनलाइन प्रणाली तयार करण्यासह, प्रणालीची वार्षिक देखभाल, मोबाइल ॲप्लिकेशनची निर्मिती करणे, त्यासाठीचा करावा लागणारा खर्च याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास प्रकल्प अंमलबजावणी समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाळा निवड करणे, अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ होण्यासह परिणामकारक पद्धतीने सुविधा उपलब्ध करणे शक्य होणार आहे.
योजनेला राजे यशवंतराव होळकर यांचे नाव
भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याच्या योजनेला धनगर नामांकित शाळा योजना असे नाव होते. मात्र, आता योजनेचे नामकरण ‘राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजना’ असे करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.