पुणे : जिल्हा निवडणूक शाखेकडून शहरासह जिल्ह्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवसाच्या दहा दिवसांपूर्वीपर्यंत नाव नोंदविण्याची मुभा आहे. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी १९ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे, तर पुणे, शिरूर आणि मावळ मतदारसंघांसाठी २५ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील मतदारांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या पुणे जिल्ह्यात मिळून एकूण ८२ लाख २४ हजार ४२३ मतदार आहेत. यापैकी अनेक मतदार हे दुबार म्हणजेच बऱ्याच जणांनी दोन-दोन ठिकाणी नावे आहेत. जिल्हा निवडणूक शाखेकडून अनेक दुबार आणि मृत मतदारांची नावे विहित प्रक्रिया करून वगळण्यात आली आहेत. मात्र, ही प्रक्रिया लांबलचक असल्याने अनेक दुबार मतदारांची नावे अद्यापही मतदार यादीत आहेत.
       
यंदा पुणे जिल्ह्यात दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान ७ मे, तर पुणे, शिरूर आणि मावळ या मतदारसंघांसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. याशिवाय राज्यातील विविध भागांतून पुण्यात स्थलांतरित झालेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर अनुपस्थित, स्थलांतरित आणि मृत मतदारांची (absent, shifted, death -ASD) स्वतंत्र यादी तयार करून ती यादी बीएलओकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे दुबार मतदार ओळखता येणे शक्य होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा…पुणे : प्रेम प्रकरणातून शाळकरी मुलाचा खून, सिंहगड परिसरातील मणेरवाडीतील घटना

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार दुबार नावे वगळण्यासाठी संबंधित मतदाराने दोन्हीपैकी एका ठिकाणाहून आपले नाव मतदार यादीतून वगळण्यासाठी अर्ज देणे अनिवार्य आहे. परंतु, असा अर्ज भरून दिला नसल्यास प्रशासनाकडून अशा मतदारांच्या पत्त्यावर जाऊन तपासणी करण्यात येते. मतदार पत्त्यावर नसल्यास किंवा स्थलांतरित झाल्यास ज्या ठिकाणी स्थलांतरित आहे, त्या ठिकाणच्या मतदारसंघात समन्वय अधिकाऱ्यांकडून अशीच प्रक्रिया राबविण्यात येते. एवढे करूनही कोणताच संपर्क झाला नाही, तर अशा संशयास्पद अनुपस्थित, स्थलांतरित किंवा मृत असल्यास त्याबाबतची (अब्सेंट, शिफ्टेड आणि डेड – एएसडी) स्वतंत्र यादी तयार करण्यात येते. ही यादी “बीएलओ”कडे देण्यात येते. त्यानुसार प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदाराची योग्य ओळख पटल्यानंतरच मतदानास परवानगी देण्यात यावी, अशा सूचना आयोगाने दिल्या आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune election commission going to take action against duplicate voting names pune print news psg 17 psg