Ganesh Visarjan Pune Traffic Updates: पुण्यातील विसर्जन मिरवणूक चोवीस तास उलटल्यानंतरही सुरूच आहे. विसर्जन मिरवणूक मार्गावर उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धक यंत्रणेचा दणदणाट सुरू आहे. यंदा किती तास लागणार याची उत्सुकता आहे. पोलिसांकडून विसर्जन मिरवणूक लवकर आटोपणासाठी प्रयत्न सुरू आहेत.
विसर्जन मार्गावरील दणदणाटाने आवाजाची मर्यादा ओलांडली आहे. ध्वनिवर्धक, ढोल ताशांच्या आवाजामुळे विसर्जन मार्ग परिसरातून चालणेदेखील अवघड झाले होते. आवाजाने थरकाप उडत होता. दणदणाटामुळे रहिवाशांसह भाविकांनाही त्रासाला सामोरे जावे लागले.
वैभवशाली परंपरा असलेल्या विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ प्रथेप्रमाणे शनिवारी (६ सप्टेंबर) मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा चौकातून झाला. यंदा विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ एक तास आधी म्हणजेच सकाळी साडेनऊच्या सुमारास झाला. विसर्जन मार्गावरून मानाची मंडळे मार्गस्थ झाल्यानंतर सायंकाळनंतर ध्वनिवर्धकांचा दणदणाट सुरू झाला. अनेक मंडळांनी ध्वनिवर्धकासह प्रखर प्रकाशझोत सोडले होते.
ध्वनिवर्धकांच्या भिंतींसमोर तरुणाई बेधुंद नाचत असल्याचे पाहायला मिळाले. बाजीराव रस्त्यामार्गे कुमठेकर रस्त्यावरील मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळानी उच्च क्षमेतेच्या ध्वनीवर्धकांचा दणदणाट केल्यामुळे विसर्जन मिरवणुकीतील देखावे पाहणाऱ्या भाविकांना त्रास झाला. ढोल ताशा पथकांच्या आवाजानेही मर्यादा ओलांडली होती. भाविकांसह स्थानिक रहिवाशांना आवाजाचा त्रास झाला. लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता परिसरात सायंकाळनंतर मोठी गर्दी झाली होती. आकर्षक देखावे प्रकाश योजनेमुळे लक्षवेधी ठरले होते.
विसर्जन मार्गावरील बहुतांश मंडळांनी उच्च क्षमेतेची ध्वनिवर्धक यंत्रणा वापरली होती. ध्वनिवर्धक तसेच ढोल-ताशा पथकांनी आवाजाची मर्यादा ओलांडल्याने पोलीसही हतबल झाले.