पुणे : पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करण्यास मतदारांचा निरुत्साह असतानाच या निवडणुकीसाठी एक गठ्ठा पद्धतीने अर्ज स्वीकरण्यात येणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे मतदारांना वैयक्तिक मतदार यादीत नाव नोंदवावे लागणार आहेत. मात्र, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी शैक्षणिक संस्था एकत्रितरित्या सर्व शिक्षकांचे नोंदणी अर्ज संबंधित तहसील कार्यालयात जमा करु शकणार आहेत.

दरम्यान, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत. सन २०२० मध्ये नाव नोंदणी असलेल्या पदवीधर आणि शिक्षकांना पुन्हा नव्याने नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील याद्यांमध्ये नव्याने नाव नोंदणी करण्यासंदर्भात विभागीय आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विधानभवनामध्ये गुरुवारी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांची बैठक घेतली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अपर आयुक्त तुषार ठोंबरे, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मीनल कळसकर, राजकीय पक्षांचे जिल्ह्यातील प्रमुख, प्रतिनिधी तसेच विभागातील सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकारी, राजकीय पक्ष प्रमुख आणि शैक्षणिक संस्था प्रमुख दूरदृष्यप्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित होते.

अधिकाधिक पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदवावे यादृष्टीने राजकीय पक्षांनी आणि शिक्षण संस्थांनी सक्रीय सहभाग द्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यावेळी केले.

‘पदवीधर नाव नोंदणीसाठी नमुना क्रमांक १८ आणि शिक्षक नाव नोंदणीसाठी नमुना क्रमांक १९ भरणे आवश्यक आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या यादीतील विद्यापीठातून १ नोव्हेंबर २०२५ पूर्वी किमान ३ वर्षापूर्वी पदवीधर झालेला किंवा पदवीशी समकक्ष शैक्षणिक पात्रता धारण करणारा पदवीधर मतदानासाठी पात्र राहणार आहे. तसेच सन २०१९ ते २०२५ या कालावधीत किमान ३ वर्षे शिक्षक पदावर कार्यरत असलेला, माध्यमिक आणि त्यावरील दर्जाच्या मान्यताप्राप्त शाळांमधील पूर्णवेळ शिक्षक नाव नोंदणीसाठी पात्र राहणार आहेत.

शैक्षणिक संस्था एकत्रितरित्या सर्व शिक्षकांचे नोंदणी अर्ज संबंधित तहसील कार्यालयात जमा करू शकणार आहेत. शैक्षणिक संस्थांनी नमुना क्रमांक २ मधील शिफारशीसह अर्ज सादर करावेत, असे डाॅ. पुलकुंडवार यांनी स्पष्ट केले.

नाव नोंदणी वाढविण्यासाठी नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने व्हावी, सुट्टीच्या दिवशी गृहनिर्माण संस्थांमध्ये नाव नोंदणीसाठी शिबिरांचे आयोजन करावे, अशा काही सूचना राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी यावेळी केल्या.

मतदार यादीचा कार्यक्रम

मतदार यादीसंदर्भात येत्या तीस सप्टेंबर रोजी जाहीर सूचना वर्तमानपत्रातून देण्यात येणार आहे. त्यानंतर पंधरा ऑक्टोबर, २५ ऑक्टोबर या दिवशी पुन्हा जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नमुना क्रमांक १८ किंवा १९ द्वारे दावे ६ नोव्हेंबर रोजी स्वीकारून हस्तलिखिते तयार करणे आणि प्रारुप मतदार याद्यांची छपाई २० नोव्हेंबर रोजी केली जाणार आहे. प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी २५ नोव्हेंबर रोजी केली जाणार असून २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. २५ डिसेंबर रोजी दावे आणि हरकती निकाली काढून पुरवणी यादी तयार करणे आणि त्यांची छपाई करण्यात येणार असून तीस डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.