पुणे : ‘अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत दिली जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना मदत करताना अटी आणि शर्ती शिथिल कराव्या लागतील,’ असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी स्पष्ट केले. ‘दौरे केल्याशिवाय लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांना खरी परिस्थिती कळत नाही. त्यामुळे यामध्ये कोणतेही राजकारण न आणता सर्वांनी शेतकऱ्यांच्या मागे उभे राहावे,’ असे आवाहनही त्यांनी केले.

बीएसएनएल ‘४ जी’ तंत्रज्ञानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात झाला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.ते म्हणाले, ‘दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हातात नुकसानभरपाईचे पैसे मिळाले पाहिजेत, त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांना मदत करताना अटी आणि शर्ती शिथिल कराव्या लागतील. शेतकऱ्यांवर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मदतीची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वीही राज्यावर संकट आले; त्या वेळी केंद्र सरकारने मदत केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मदतीची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करण्याचा हा काळ आहे. त्यानुसार राज्य सरकारकडून तत्काळ मदत केली जात आहे.’

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नेत्यांनी दौरे बंद करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, अशी सूचना केली आहे; याबाबत विचारणा केली असता, शिंदे म्हणाले, ‘बांधावर गेल्याशिवाय परिस्थिती समजत नाही. घरात बसून नक्की किती नुकसान झाले, हे समजू शकत नाही. परिस्थितीचे गांभीर्य लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी यांच्या लक्षात येत नाही. यामध्ये कोणतेही राजकारण न आणता सर्वांनी शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याची गरज आहे.’

‘मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्र्यांनी या भागात दौरे काढून शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.