पुणे : मानसिक ताणतणाव आल्यानंतर आधाराची आवश्यकता महिलांपेक्षा पुरुषांना जास्त प्रमाणात असल्याचे उघडकीस आले आहे. मानसिक समस्यांसाठी मदत घेणाऱ्या पुरुषांचे प्रमाण ६५ टक्के असून, महिलांमध्ये हे प्रमाण केवळ ३५ टक्के आहे, असा निष्कर्ष ‘कनेक्टिंग ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालातून समोर आला आहे.मानसिक ताणतणाव, नैराश्य आणि आत्महत्येचे विचार येणाऱ्या व्यक्तींसाठी ‘कनेक्टिंग ट्रस्ट’कडून हेल्पलाइन व इतर उपक्रम चालविले जातात.
कनेक्टिंग ट्रस्टकडून गेल्या २० वर्षांपासून ही सेवा पुरविली जात आहे. संस्थेने २० वर्षांतील आकडेवारीच्या आधारे जाहीर केलेल्या अहवालानुसार, संस्थेकडे हेल्पलाइनद्वारे मानसिक आधारासाठी आतापर्यंत सुमारे दीड लाख जणांनी मदत मागितली. संस्थेकडे मदत मागणाऱ्यांमध्ये १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातही पुरुषांचे प्रमाण ६५ टक्के तर महिलांचे प्रमाण ३५ टक्के आहे. संस्थेकडे कॉल करणाऱ्यांपैकी १० टक्के व्यक्ती आत्महत्येची तीव्र इच्छा असणारे होत्या.
हेल्पलाइनवर कॉल करणाऱ्या व्यक्तींना आर्थिक अडचणी आणि नातेसंबंध याविषयीच्या समस्या जास्त दिसून आल्या आहेत. आर्थिक अडचणींमध्ये कर्ज, व्यवसायातील अपयश, बेरोजगारी, तोटा आणि फसवणूक आदी समस्यांचा समावेश आहे. याचवेळी नातेसंबंधांविषयीच्या अडचणींमध्ये, पालक, भावंडे, नातेवाईक, जोडीदार, मुले, मित्रांविषयीच्या समस्यांचा समावेश आहे. नैराश्य, ताणतणाव यांसह इतर मानसिक आजार असलेल्या व्यक्तींकडूनही येणाऱ्या कॉलचे प्रमाण अधिक आहे. आरोग्याची समस्या, एकाकीपणा, महाविद्यालयातील रॅगिंग, व्यसन याबाबतही कॉल येत आहेत, असे संस्थेने म्हटले आहे.
कनेक्टिंग ट्रस्टच्या हेल्पलाइनवर दिवसभरात १२ ते १५ कॉल येतात. याचबरोबर प्रत्यक्ष संस्थेत येऊन मदत मागणाऱ्यांची संख्या दिवसाला ४ ते ७ आहे. तसेच, देशातून आणि परदेशातून दररोज १० ते १२ ई-मेल येतात. संस्थेकडून सुमारे २० शाळांमध्ये जाऊन मानसिक आरोग्यावषियची जनजागृतीचा कार्यक्रम राबविला जात आहे. त्यात विद्यार्थ्यांसह शिक्षक, कर्मचारी आणि पालकांचा समावेश आहे. आतापर्यंत सुमारे अडीच लाख जणांना य़ाचा फायदा झाला आहे, असे संस्थेने नमूद केले आहे.
पुरुषीपणाची अढी
महिला या त्यांच्या मैत्रिणी, कुटुंबातील सदस्य असलेल्या इतर महिला यांच्याशी सातत्याने संवाद साधतात. त्यामुळे त्यांच्याकडून मोकळणेपणाने सगळ्या गोष्टींची देवाणघेवाण केली जाते. याचवेळी पुरूष हे कर्ते असल्याने त्यांना मानसिक समस्या दुसऱ्यासमोर मांडण्यात कमीपणा वाटतो. त्यांचा कल मानसिक समस्या दाबून ठेवण्याकडे अधिक असतो. त्यामुळे ते व्यसनाकडे वळण्याचा धोका जास्त असतो. हेल्पलाइनवर कॉल करणाऱ्या पुरुषांना नाव विचारले जात नसल्याने ते मोकळेपणाने त्यांची समस्या मांडतात, असेही संस्थेने नमूद केले आहे.
कनेक्टिंग ट्रस्टकडून मानसिक ताणतणावाखाली असलेल्या व्यक्तींशी संवाद साधण्यात येतो. त्या व्यक्तींचे बोलणे शांतपणे ऐकूण घेऊन त्यांची मानसिक स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न आमचे स्वयंसेवक करतात. यातून त्या व्यक्तींच्या भावनांचा निचरा होऊन त्यांचा मानसिक ताण कमी होण्यास मदत होते.वीरेन राजपूत, सदस्य, सल्लागार समिती, कनेक्टिंग ट्रस्ट
