पुणे : महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुळा-मुठा नदीकाठ सुशोभीकरणासाठी मुंढवा येथील महिला व बालकल्याण विभागाची, संगमवाडी येथील संरक्षण खात्याची आणि कोरेगाव पार्क येथील वन विभागाची २२.२६ हेक्टर जमीन संपादन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. संरक्षण खात्यानेही भूसंपादनास परवानगी दिल्यामुळे मुळा-मुठा नदीकाठ सुशोभित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीचा काठ सुधारण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या ताब्यात असलेल्या विविध जागांचे भूसंपादन करावे लागणार आहे. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. जागांच्या संपादनाबाबत गुरुवारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, प्रकल्प विभागाचे प्रमुख दिनकर गोजारे, कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे आदी उपस्थित होते.
या प्रकल्पांतर्गत मुळा-मुठा नदीच्या सुमारे ४४.४ किलोमीटर काठाचे सुशोभीकरण केले जाणार आहे. संगमवाडी भागात संरक्षण खात्याची ७ हेक्टर जागा आहे. या जागेवर सुशाेभीकरणाचे काम करण्यास यापूर्वी संरक्षण विभागाने परवानगी दिली आहे. त्यानुसार या ठिकाणी काम सुरू आहे. या जागेच्या बदल्यात पुणे महापालिका संरक्षण विभागाला ३२ कोटीची कामे करून देणार आहे. संरक्षण विभागाकडून सुचविण्यात येणाऱ्या ठिकाणी ही कामे करून दिली जाणार आहेत.
येत्या आठवड्यात या जागेच्या बदल्यात केल्या जाणाऱ्या कामाबाबत संरक्षण खाते आणि पालिका यांच्यात करार होणार आहे. उर्वरित जागेचे संपादन प्रलंबित आहे. त्यामुळे या प्रकल्पात अडसर निर्माण झाला होता. आता संरक्षण विभागाने उर्वरित जागेच्या भूसंपादनासाठी परवानगी दिली आहे.
‘मुंढवा परिसरात राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाची जागा आहे. मुंढवा येथे बोटॅनिकल गार्डनची ३.४ हेक्टर जागा आहे. यासह कोरेगाव पार्क येथे वन विभागाची ११ हेक्टर जागा या प्रकल्पासाठी आवश्यक आहे. या सर्व जागांच्या संपादनासाठी चर्चा सुरू आहे,’ असे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले.
महापालिकेच्या नदीकाठ सुधार योजनेतील एका टप्पाचे काम ‘पीपीपी’ तत्त्वावर सुरू आहे. या कामासाठी भूसंपादन न झाल्याने हे काम संथ गतीने सुरू आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जागांचे संपादन लवकरात लवकर कसे होईल, यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. – नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका