पुणे : महापालिकेतील सर्व कायमस्वरुपी कर्मचारी आणि शिक्षकांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान, रोख स्वरुपात दिवाळी भेट दिली जाते. ही रक्कम पगाराच्या ८.३३ टक्के असते. मात्र, मानधनावर कार्यरत असलेल्या शिक्षणसेवकांना या अनुदानापासून वंचित ठेवण्यात आल्याचे शिक्षक संघटनेचे म्हणणे असून, तातडीने दिवाळी भेट देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पुणे महापालिकेतील १८० दिवसांची सेवा पूर्ण केलेल्या शिक्षणसेवकांना अद्यापही दिवाळी भेट मिळालेली नाही. वर्षानुवर्षे ही भेट सर्व कर्मचाऱ्यांना नियमितपणे देण्यात येते. मात्र, शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना यापासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे. कामगार युनियन आणि महापालिका प्रशासन यांच्यात सन २००३पासून अस्तित्त्वात आलेल्या करारानुसार १८० दिवस पूर्ण केलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला बोनस देणे बंधनकारक आहे. पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त झालेल्या सुमारे ४५०हून अधिक शिक्षकांनी ही अट पूर्ण केलेली असूनही अद्याप दिवाळी भेट मिळालेली नाही.
दिवाळी भेट ही केवळ आर्थिक मदत नाही, तर शिक्षकांच्या प्रामाणिक परिश्रमांची सामाजिक आणि मानवी मान्यता आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी भेट वितरित करून शिक्षण सेवकांचीही दिवाळी गोड करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ पुणे शहरचे शिक्षण सेवक प्रतिनिधी हनुमंत रणदिवे यांनी केली.
दरम्यान, कंत्राटी आणि निकष पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेवेतील परीविक्षाधीन कर्मचाऱ्यांना ही भेट देता येत नाही. मात्र, या संदर्भात पडताळणी करण्यात येईल, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चंद्रन यांनी सांगितले.