पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या शक्तिस्थळांपर्यंत ५०० रुपयांत विशेष बससेवा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देवीभक्तांना कोंढणपूर येथील तुकाईमाता मंदिर, शिवरीतील यमाईमाता मंदिर, कोडीतमधील श्री नाथ म्हस्कोबा, जोगेश्वरी माता मंदिर यांसह तांबडी जोगेश्वरी, तळजाई, पद्मावती, चतुःशृंगी गड आदी शक्तिस्थळांपर्यंत प्रवास करून दर्शन घेता येणार आहे.
पीएमपीच्या पर्यटन सेवेला शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्यांमध्ये प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतो. त्यामुळे पीएमपीएमएलने या सेवेसाठी वातानुकूलित ई-बसद्वारे विशेष पर्यटन बस सुरू केल्या आहेत. नवरात्राेत्सवानिमित्त मंगळवारपासून (२३ सप्टेंबर) शक्तिस्थळांपर्यंत दोन विशेष बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
बससेवा आणि वेळापत्रक
पीएमपी क्रमांक : १३
सुटण्याची वेळ : सकाळी ०८.३० वा.
परतण्याची वेळ : सायंकाळी ७.०० वा.
मार्ग : पुणे रेल्वे स्थानक – स्वारगेट – तळजाई माता मंदिर – पद्मावती मंदिर – तुकाई माता मंदिर, कोंढणपूर – श्रीनाथ म्हस्कोबा जोगेश्वरी माता मंदिर, कोडीत – यमाई माता मंदिर, शिवरी – स्वारगेट – पुणे रेल्वे स्थानक.
पीएमपी क्रमांक : १३ (२)
सुटण्याची वेळ : सकाळी ०८.३० वा.
परतण्याची वेळ : सायंकाळी ७.०० वा.
मार्ग : पुणे रेल्वे स्थानक – स्वारगेट – महालक्ष्मी मंदिर, सारसबाग – तांबडी जोगेश्वरी मंदिर, बुधवार पेठ – चतु:शृंगी माता मंदिर, सेनापती बापट रोड – वैष्णवी माता मंदिर, पिंपरी कॅम्प – भवानी माता मंदिर, भवानी पेठ – स्वारगेट – पुणे रेल्वे स्थानक
पीएमपीच्या पर्यटन सेवा मार्गावर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवानिमित्त शक्तिस्थळ मार्गांवर दोन विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण ३३ प्रवाशांनी सामूहिक आगाऊ आरक्षण केल्यास पाच प्रवाशांच्या तिकिटात १०० टक्के सवलत देण्यात येणार आहे. – पंकज देवरे, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी