पुणे : रिक्षा प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून त्यांना लुटणाऱ्या रिक्षाचालकाला वानवडी पोलिसांनी अटक केली. रिक्षाचालकाबरोबर लूटमारीचे गुन्हे करणाऱ्या दोन अल्पवयीनांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीने चोरलेल्या मोबाइलची संकेतस्थळाच्या माध्यमातून विक्री केली. चोरट्याकडून ३० मोबाइल संच जप्त करण्यात आले.
या प्रकरणी फैजान मोहम्मद गौस शेख (रा. जामा मशीदजवळ, आदर्शनगर, ऊरळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) याला अटक करण्यात आली. त्याच्याबरोबर गुन्हे करणाऱ्या दोन अल्पवयीन साथीदारांना देखील ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून तीन लाख ७० हजार रुपयांचे ३० मोबाइल संच आणि रिक्षा जप्त करण्यात आली. हडपसर भागातील नवीन म्हाडा वसाहत परिसरातील कच्च्या रस्त्यावर रिक्षा थांबली असून, रिक्षातील तिघे जण परप्रांतीय बांधकाम मजुरांना मोबाइल संच विक्री करत असल्याची माहिती वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अतुल गायकवाड आणि अमोल पिलाणे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसंचे पथक तेथे गेले. पोलिसांना पाहताच फैजान शेख आणि साथीदार रिक्षातून पसार होण्याच्या प्रयत्नात होते.
पोलिसांनी रिक्षा थांबविली. रिक्षाची तपासणी केली. तेव्हा रिक्षात चाकू आणि मोबाइल संच सापडला. चौकशीत आरोपी शेख आणि अल्पवयीन साथीदारांनी रिक्षातून सोडण्याचा बहाणा करुन प्रवाशांना चाकूच्या धाकाने लुटल्याचे उघडकीस आले. त्यांच्याकडून ३० मोबाइल संम्जप्त करण्यात आले. आरोपींनी तीन गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले. आरोपी शेखने संकेतस्थळाच्या माध्यमातून मोबाइल संच विक्री केल्याची माहिती मिळाली आहे.
परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस कर्मचारी दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, गोपाळ मदने, अभिजित चव्हाण, अमोल गायकवाड, अर्शद सय्यद, विठ्ठल चोरमले, यतीन भोसले, बालाजी वाघमारे, आशिष कांबळे,सुजाता फुलसुंदर यांनी ही कामगिरी केली.
आरोपी प्रवाशांना शिवाजीनगर स्थानक परिसरात सोडण्याची बतावणी करायचे. त्यांच्याकडून ५० रुपये भाडे घ्यायचे. सोलापूर रस्त्यावरील रेसकोर्स, भैरोबानाला परिसरातील निर्जन भागाता रिक्षा थांबवून आरोपी प्रवाशांना चाकुच्या धाकाने लुटायचे. प्रवाशांकडील रोकड, मोबाइल संच लुटून ते पसार व्हायचे.