पुणे : समाज माध्यमातून झालेली ओळख एका मिठाई विक्रेत्याला महागात पडली. एका महिलेने मिठाई विक्रेत्याला धमकावून त्याच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका मिठाई विक्रेत्याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका ३० वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेली महिला मूळची सांगली जिल्ह्यातील आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४५ वर्षीय मिठाई विक्रेता लष्कर भागात राहायला आहे. त्यांचे लक्ष्मी रस्त्यावर मिठाई विक्रीेचे दुकान आहे. समाज माध्यमातून मिठाई विक्रेत्याची आरोपी महिलेशी ओळख झाली होती. त्यानंतर आरोपी महिलेने त्यांना जाळ्यात ओढले. २५ सप्टेंबर रोजी आरोपी लक्ष्मी रस्त्यावर मिठाई विक्री दुकानात आली. मिठाई विक्रेत्याची कुटुंबीयांसमोर बदनामी करण्याची धमकी देऊन दुकानाच्या गल्ल्यातील ५०० रुपये आणि मिठाईचे खोके ती घेऊन गेली.
त्यानंतर महिला पुन्हा मिठाई विक्रेत्याला भेटण्यासाठी आली. कुटुंबीयांसमोर बदनामी करण्याची धमकी दिली, तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन ७०० हजार रुपये घेतले. ७० हजार रुपये घेतल्यानंतर आरोपी महिलेने पुन्हा धमकावून हे प्रकरण मिटविण्यासाठी दोन लाख रुपये मागितले. तेव्हा मिठाई विक्रेत्याने तिला दुकानात बोलाविले. दुकानात दोन लाख रुपये देतो, असे सांगितले. तेव्हा तिने दुकानात येण्यास नकार दिला. ऑनलाइन पद्धतीने दोन लाख रुपये पाठविण्यास सांगितले. मिठाई विक्रेत्याने आरोपी महिलेच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने २५ हजार रुपये पाठविले.
महिलेच्या धमकीमुळे घाबरलेल्या मिठाई विक्रेत्याने फरासखाना पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक शीतल जाधव तपास करत आहेतत. मिठाई विक्रेत्याला धमकावून त्याच्याकडून एक लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या आरोपी महिलेचा शोध घेण्यात येत आहे.
समाज माध्यमात अनोळखी व्यक्ती किंवा महिला मैत्रीची विनंती पाठवितात. शक्यतो अनोळखी व्यक्तीबरोबर मैत्री करु नये. यापूर्वी मैत्रीचे आमिष दाखवून फसवणूक, तसेच खंडणी उकळण्याच्या घटना घडल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांसह व्यावसायिकांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून खंडणी उकळण्यच्या घटना घडल्या आहेत. परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने फसवणूक करण्याच्या घटना घडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी अशाच पद्धतीने एका व्यावसायिकाला धमकावून त्याच्याकडून पैसे उकळण्याची घटना घडली होती.