पुणे : ‘ओला, उबर आणि रॅपिडो या ॲग्रीगेटर कंपन्या, परिवहन विभागाच्या आदेशाला न जुमानता व्यवसाय करत आहेत. यातील काही कंपन्यांवर पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या असताना परिवहनमंत्री या श्रीमंत कंपन्यांना परवानगी देत आहे,’ असा आरोप महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डाॅ. केशव क्षीरसागर यांनी करत ३० सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर राज्यव्यापी आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला.

जोपर्यंत या कंपन्यांवर कारवाई होत नाही आणि परिवहनमंत्र्यांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत राज्यातील सर्व टॅक्सी, कॅब आणि रिक्षाचालक बेमुदत संपावर जाणार असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले.

परिवहन आयुक्तालयाच्या निर्देशानुसार, प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या ओला, उबेर आणि रॅपिडोसारख्या ॲग्रीगेटर कंपन्यांना प्रति किलोमीटर ३२ रुपये प्रमाणे दर निश्चित करून दिले आहेत, तरी या कंपन्या चालकांना प्रति किलोमीटर १० ते ११ रुपये दरानुसार मोबदला देतात. याबाबत गेल्या महिन्यात राज्यभरातील रिक्षा, कॅब, टॅक्सीचालकांनी आंदोलन केले होते.

सहाय्यक परिवहन आयुक्त भरत कळसकर यांनी या ॲग्रीगेटर कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन २२ रुपये ५० पैसे असा दर देण्याबाबत सुवर्णमध्य काढला. कंपन्यांकडूनही याला प्रतिसाद देत १६ सप्टेंबरपासून ऑनलाईन ॲपवर नवीन दराची अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, तिन्ही कंपन्यांकडून जुनेच दर कायम ठेवल्याने चालक संघटना पुन्हा आक्रमक झाल्या आहेत.

क्षीरसागर म्हणाले, ‘ओला, उबर, रॅपिडो कंपन्यांवर वेळोवेळी कारवाई करण्यात आली आहे. रॅपिडो कंपनीविरोधात स्वत: परिवहनमंत्र्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते, आज तेच परिवहनमंत्री प्रताप सरनाईक रॅपिडो कंपनीला वाहतुकीचा परवाना देत आहेत. त्यांच्या दहीहंडी उत्सवासाठी प्रायोजक बनवून पाठीशी घालत आहे, हे स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे लाखो रिक्षा, कॅब आणि टॅक्सी चालकांच्या आर्थिक रोजीरोजीचा प्रश्न निर्माण झाला असताना या कंपन्यांना मात्र, ‘रेड कार्पेट’ टाकले जात आहे. त्यामुळे आता राज्यभरातील सर्व संघटनांचे रिक्षा, टॅक्सी, कॅब चालक आझाद मैदानावर आंदोलनाला बसणार आहेत.’

महायुती विरोधात मतदान…

आगामी काळात राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यातच सत्ताधारी महायुती सरकार गरिबांच्या पाठिशी नसून श्रीमंतांपुढे पायघड्या घालत आहेत असा आरोप क्षीरसागर यांनी करत तातडीने या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच ‘मोदीजी सुनीए.. टेस्लावाले भ्रष्ट परिवहन मंत्री का इस्तिफा लिजीए’ अन्यथा आगामी निवडणुकीत महायुती विरोधात मतदान करावे…त्यासाठी ३० तारखेला मुंबई आझाद मैदानावर एकत्र येऊन प्रतिज्ञा करूयात एकत्र यावे, असे आवाहन करणारी पत्रके पुण्यातील कॅब आणि रिक्षांवर चिकटविण्यात आली आहेत.