पुणे : पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेने आंतरराष्ट्रीय स्तरावर नाममुद्रा उमटवली आहे. खेड तालुक्यातील जालिंदरनगरच्या जिल्हा परिषद शाळेने ‘वर्ल्ड्स बेस्ट स्कूल प्राइज’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील लोकसहभाग या गटात जगातील पहिल्या दहा शाळांमध्ये स्थान प्राप्त केले असून, या गटात असे स्थान मिळवणारी ही देशातील एकमेव शाळा ठरली आहे.

‘टी-फोर एज्युकेशन’ या संस्थेतर्फे जगभरातील शाळांसाठी स्पर्धा घेण्यात आली. त्यातील ‘सपोर्टिंग हेल्दी लाइव्ह्ज’, ‘इनोव्हेशन’, ‘एन्व्हायर्न्मेंटल ॲक्शन’, ‘ओव्हरकमिंग ॲडव्हर्सिटी’, ‘कम्युनिटी कोलॅबोरेशन’ (लोकसहभाग) या गटांमध्ये जगभरातील प्रत्येकी सर्वोत्कृष्ट दहा शाळांची निवड करण्यात आली. त्यात जालिंदरनगरच्या जिल्हा परिषद शाळेने लोकसहभाग या गटात पहिल्या दहा क्रमांकांत स्थान मिळवून राज्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे. या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाममुद्रा उमटली आहे. जालिंदरनगरच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक संदीप म्हसुडगे, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त दत्तात्रय वारे कार्यरत आहेत. त्यांच्या प्रयत्नांनी शाळेचा कायापालट झाला आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील शाळेच्या कामगिरीबाबत आनंद व्यक्त करून दत्तात्रय वारे म्हणाले, ‘राज्यातील सरकारी शाळा पहिल्यांदाच जागतिक पातळीवर पहिल्या दहा क्रमांकांत आली आहे. त्यामुळे सरकारी शाळाही स्पर्धा करू शकते हा आत्मविश्वास आला आहे. ही कामगिरी सरकारी शाळा काय करू शकतात, हे दाखवण्यासाठी महत्त्वाची आहे. या पुरस्कारामुळे आता पुढील प्रवासासाठी दिशा मिळाली आहे. यापुढे अधिक व्यापक विचार केला जाईल. सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना साहित्य, नवनव्या गोष्टींचा परिचय, मार्गदर्शन मिळाल्यास तेही उत्तम कामगिरी करू शकतात.’

दोन वर्षांत तीनवरून १२० विद्यार्थी

जालिंदरनगर शाळेत दोन वर्षांपूर्वी केवळ तीन विद्यार्थी होते. मात्र, विविध खासगी कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे (सीएसआर) शाळेत अनेक सुविधा विकसित करण्यात आल्या. तसेच, विविध उपक्रमांची जोड देण्यात आली. सीएसआरद्वारे दोन वर्षांत सुमारे २५ ते ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला. या सगळ्याचा सकारात्मक परिणाम होऊन पटसंख्या १२०पर्यंत वाढली आहे, असे वारे यांनी सांगितले.

देशातील अन्य तीन शाळाही मानकरी

स्पर्धेतील सपोर्टिंग हेल्दी लाइव्ह्ज या गटात फरिदाबादच्या गव्हर्न्मेंट गर्ल्स सीनिअर सेकंडरी स्कूल एनआयटी ५, इनोव्हेशन गटात बेंगळुरूच्या एक्या स्कूल जेपीनगर, एन्व्हायर्न्मेंटल ॲक्शन या गटात वाराणसीच्या दिल्ली पब्लिक स्कूल या शाळांनीही जगातील पहिल्या दहा क्रमांकांत स्थान प्राप्त केले आहे.