पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संमतिपत्रे दिलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोजणी प्रक्रियेला प्रारंभ झाल्यानंतर त्याला गती मिळण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ८०२ एकर जमिनीची मोजणी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा प्रशानसाकडून देण्यात आली.

पुरंदर विमानतळासाठी संमतीने जागा देण्याची मुदत संपुष्टात आल्यानंतर गेल्या शुक्रवारपासून प्रत्यक्ष मोजणी प्रक्रियेला जिल्हा प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली. मोजणी प्रक्रिया येत्या २० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दरनिवाडा निश्चित करून शेतकऱ्यांना देण्यात येणारा मोबदला आणि परताव्याबाबत सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर थेट भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

जमिनीची मोजणी करण्यासाठी प्रारंभी जिल्हा प्रशासनाकडून पाच स्वतंत्र पथकांची स्थापना करण्यात आली होती. मात्र, ही प्रक्रिया वेगाने व्हावी, यासाठी आणखी एक पथक स्थापन करण्यात आले आहे. महसूल, वन, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुरंदर उपसा सिंचन योजनेतील अधिकाऱ्यांचा या पथकामध्ये समावेश आहे.

फळझाडे, शेतविहिरी आणि जलवाहिन्यांचे मूल्यांकन मोजणी प्रक्रियेत करण्यात येत आहे. ही सर्व प्रक्रिया शांततेत सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

पुरंदर विमानतळासाठी पारगाव, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी आणि वनपुरी अशा सात गावांमधून जमीन संपादित होणार आहे. विमानतळासाठी एकूण तीन हजार एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. संमतिपत्रे देण्याच्या कालावधीत ३ हजार २२० शेतकऱ्यांनी २ हजार ८१० एकर जागेचे संपादन करण्यासंदर्भातील संमतिपत्रे सादर केली आहेत. त्यानुसार ९५ टक्के जागा ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.