लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: देशभरात मोसमी पाऊस उशिराने सक्रिय झाल्याचा परिणाम म्हणून भात आणि कापूस लागवडीत घट झाली आहे. पण, अन्य पिकांचे लागवड क्षेत्र वाढल्याने खरीप पेरण्यांनी जूनअखेरची सरासरी गाठली आहे. यंदा जूनअखेर देशात २०३.१८ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे, मागील वर्षी २०२.३३ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी जूनअखेर ३६.०५ लाख हेक्टरवर भात पेरणी झाली होती, यंदा याच काळात भात पेरणी २६.५५ लाख हेक्टर इतकी झाली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत सुमारे दहा लाख हेक्टरने पेरणी पिछाडीवर आहे. मागील कापसाची पेरणी ४७.०४ लाख हेक्टरवर झाली होती, ती यंदा ४०.४९ लाख हेक्टर इतकी झाली आहे. कापूस लागवड सुमारे सात लाख हेक्टरने कमी झाली आहे.

हेही वाचा… पर्यटकांचं आकर्षण असलेलं लोणावळ्यातील ‘भुशी धरण’ ओव्हरफ्लो

राज्यस्थान, हरियाना आणि पंजाबच्या काही भागांचा अपवाद वगळता देशभरात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. मात्र, देशाच्या बहुतांश भागाला आजही पेरणी योग्य पावसाची प्रतीक्षा आहे. जूनअखरे होणाऱ्या खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी गाठली आहे. मागील वर्षी जून २०२२ मध्ये २०२.३३ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, यंदा जूनअखेरपर्यंत २०३.१८ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे.

कडधान्यांची ४ लाख हेक्टरवर पेरणी

देशात जूनअखेर कडधान्यांची पेरणी १८.१५ लाख हेक्टरवर झाली आहे. मागील वर्षी याच काळात १८.५१ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा तूर १.११, उदीड १.७२, मूग ११.२३, कुळीथ ०.०९ आणि अन्य कडधान्यांची ४ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे.

पोषक तृणधान्यांचे क्षेत्र वाढले

यंदा जगभरात आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षे साजरे केले जात आहे. देशातही तृणधान्य लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. मागील वर्षी जूनअखेर २२.४१ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, यंदा ३६.२३ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. ज्वारी ०.९८, बाजरी २५.६७, नाचणी ०.८८ आणि अन्य तृणधान्यांची पेरणी ०.६१ आणि मक्याची पेरणी ८.१० लाख हेक्टरवर झाली आहे.

तेलबियांच्या लागवडीत वाढ

यंदा जूनअखेर देशात २१.५५ लाख हेक्टरवर तेलबियांची लागवड झाली आहे. मागील वर्षी १८.८१ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा भूईमूग १५.७७, सोयाबीन ०.२६, सूर्यफूल ०.२६, तीळ ०.८० लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rice and cotton cultivation has declined as a result of late monsoon across the country pune print news dbj 20 dvr