पुणे : शहरात पेट्रोल पंपांवरील कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या घटना वाढत असल्याने पेट्रोल पंपचालक आणि विक्रेता संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हे प्रकार न रोखल्यास सोमवारपासून (२४ नोव्हेंबर) सायंकाळी सात वाजेनंतर पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय ऑल इंडिया पेट्रोल-डिझेल असोसिएशनने घेतला आहे. याबाबतचे निवेदन संघटनेने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले आहे. येत्या दोन दिवसांत या विषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे ऑल इंडिया पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी सांगितले.

‘शहरात अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत; तर काही पंपांवर २४ तास सेवा सुरू असते. मात्र, गेल्या महिन्यापासून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण आणि कोयत्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. सुटे पैसे, रांगेत विलंब अशा किरकोळ कारणांवरून या कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवरील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या गेल्या दीड महिन्यात सहा घटना घडल्या आहेत. याबाबत पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत.

येरवडा येथील एका पेट्रोल पंपावर सुट्या पैशांवरून झालेल्या वादात तिघांनी कर्मचाऱ्याबरोबरच मालकालाही मारहाण केल्याची घटना घडली. पोलिसांनी संबंधित आरोपींना अटक करून त्यांची धिंड काढली. मात्र, त्यानंतरही अशा घटना सुरूच आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटना थांबल्या नाहीत, तर येत्या सोमवारी सायंकाळी सातनंतर पेट्रोल पंपावरील काम बंद करण्यात येईल,’ असे पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शहरात ‘इंडियन ऑईल’, भारत पेट्रोलिय, हिंदूस्तान पेट्रोलियम, सीएनजी, एमएनजीएल या कंपन्यांचे अनेक पेट्रोल पंप आहेत. या पेट्रोल कंपन्यांना देखील मारहाणीच्या घटनांबाबत कळविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या निवेदनाची प्रत या कंपन्यांनाही ई-मेलद्वारे पाठविण्यात आली असल्याचे, रुपारेल यांनी सांगितले.

किरकोळ वादातून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी पेट्रोल पंपावर सुरक्षा प्रदान करावी. – ध्रुव रुपारेल, अध्यक्ष, पुणे पेट्रोल-डीलर्स असोसिएशन.

गेल्या महिनाभरापासून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाणीचे प्रकार घडत आहेत. सीएनजी पंपावर विलंब होत असल्याने मारहाण केली जात आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे. या प्रश्नावर येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात येणार आहे. – अली दारुवाला, प्रवक्ते, ऑल इंडिया पेट्रोल-डिझेल असोसिएशन.