शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील राजकारणात उलथापालथ झाली आहे. त्यांच्यासोबत जळपास ५० पेक्षाही अधिक आमदार असल्याने महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या मार्गावर आहे. एवढच नाहीतर अद्यापही शिवसेनेचे आजीमाजी आमदार तसेच मंत्री एक-एक करून एकनाथ शिंदे गटात सामील होताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी “हिंदुत्वाच्या मुद्य्यासाठी एकनाथ शिंदे लढत आहेत. त्यामुळे मी त्यांच्यासोबत आहे. आता तरी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून आघाडीतून बाहेर पडावं.” असं आज पुण्यात पत्रकारपरिषदेत जाहीर केलं आहे. तसेच, “आजच्या राजकीय परिस्थितीला संजय राऊत हेच जबाबदार आहेत.” असं देखील शिवतारेंनी बोलून दाखवलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कामे करू दिली नाही –

यावेळी विजय शिवतारे म्हणाले की, “मागील २५ ते ३० वर्ष ज्या शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी मतदार संघाची बांधणी केली. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत संघर्ष केला. आज त्याच नेत्यासोबत काम करण्याची वेळ आली आहे. दुसर्‍या बाजुला मागील अडीच वर्षाच्या काळात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काम करू दिली नाही. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी तक्रार करून देखील त्याची दखल घेतली गेली नाही. यामुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत. हे लक्षात घेऊन, एकनाथ शिंदे यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.”

उद्धव ठाकरे हे अतिशय सज्जन माणूस परंतु त्यांना अक्षरशः घेरले आहे –

तसेच ते पुढे म्हणाले की, “आम्ही १०० टक्के बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वावर चालणारे लोक आहोत, त्यामध्ये कोणत्याही प्रकाराचा वाद नाही. उद्धव ठाकरे हे अतिशय सज्जन माणूस परंतु अक्षरशः त्यांना घेरले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज माझ्या पुरंदर विधानसभा मतदार संघातील दोन हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये ठराव केला आहे. त्या ठरावाची प्रत उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात येणार आहे.”

आता तरी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या हाकेला ओ दिली पाहिजे –

“आज देखील आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत, पण महाविकास आघाडी सोबत राहणार नाही. आज एकनाथ शिंदे यांच्यासोबत ५१ हून अधिक आमदार आहेत. ते हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन पुढे जात असून प्रामुख्याने शिवसेना आणि शिवसैनिक टिकला पाहिजे, हीच भावना एकनाथ शिंदे यांची आहे. आता तरी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या हाकेला ओ, दिली पाहिजे. अशी माझ्यासह अनेक शिवसैनिकांची भावना असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आता उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून बाहेर पडाव, अशी माझी भूमिका आहे.” असंही यावेळी बोलून दाखवलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut is responsible for todays situation of shiv sena vijay shivtare msr