शिरूर : शिरूर नगरपरिषदचे यंदाच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपद हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले असल्याने या नगरपरिषदेवर ‘महिलाराज’ कायम राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईत होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्यांचे लक्ष लागले होते. मागील निवडणुकीत सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव होते. यावेळी ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्याने या नगरपरिषदेवर महिलाराज कायम राहिले आहे.
या नगरपरिषदेत यापूर्वी २१ नगरसेवक होते. तीन जागांची वाढ झाल्याने आता नगरसेवक पदाची संख्या २४ झाली आहे. माजी नगराध्यक्षा अलका सरोदे, सुवर्णा लोळगे, माजी नगरसेविका अंजली थोरात या नगराध्यक्षपदाच्या दावेदार असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप याबाबत चित्र स्पष्ट झालेले नाही.
शिरूर नगरपरिषद ही जिल्ह्यातील महत्त्वाची नगरपरिषद असून, गेल्या अनेक वर्षांपासून उद्योगपती प्रकाश धारिवाल यांच्या नेतृत्वाखालील ‘शिरूर शहर विकास आघाडी’चे वर्चस्व आहे. गेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव होते. नागरिकांमधून थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. त्यामध्ये वैशाली दादाभाऊ वाखारे या ‘शिरूर शहर विकास आघाडी’च्या उमेदवार निवडून आल्या होत्या. सभागृह नेते, उपनगराध्यक्ष म्हणून प्रकाश धारिवाल कार्यरत होते.
शिरूरच्या राजकारणात उद्योगपती प्रकाश धारिवाल यांची भूमिका निर्णायक असते. धारिवाल हे आगामी निवडणुकीत पॅनेल उभे करणार की तटस्थ राहणार, यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) हे तीन पक्ष एकमेकांना साथ देणार की, स्वबळावर निवडणूक लढविणार, याबाबत उत्सुकता असणार आहे. आमदार माउली कटके आणि माजी आमदार अशोक पवार यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
दरम्यान, राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगर पंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत काढण्यात आली. यावेळी नगर विकास विभागांचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, उपसचिव प्रियांका कुलकर्णी, उपसचिव विद्या हम्पय्या, अनिरुद्ध जेवळीकर यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्यातील २४७ नगरपरिषदांपैकी ३३ पदे अनुसूचित जातींसाठी, ११ पदे अनुसूचित जमातींसाठी आणि ६७ पदे ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहेत. १३६ पदे ही खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये शिरूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे.