पुणे : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात यंदा सुमारे सात टक्के मतदान वाढले आहे. त्यामुळे मतदारसंघात झालेली बंडखोरी, या मतदारसंघात असलेल्या वसाहतींमधील मतदार, लाडकी बहीण ही योजना अशा विविध पैलूंचा विचार करता या वाढीव मतदानाचा लाभार्थी कोण ठरणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवाजीनगर मतदारसंघात २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत ४३.८६ टक्के मतदान झाले होते. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी सुमारे पाच हजार मतांनी निसटता विजय मिळवला होता. त्यांना ५८ हजार ७२७, तर काँग्रेसचे दत्ता बहिरट यांना ५३ हजार मते मिळाली होती. त्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने १० हजार पाचशे, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराने सुमारे पाच हजार मते मिळवली होती. तर २ हजार ३०० मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली होती. या पार्श्वभूमीवर, महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे सिद्धार्थ शिरोळे, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे दत्ता बहिरट यांच्यात प्रमुख लढत आहे. काँग्रेसमध्ये मनीष आनंद यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली.

हेही वाचा – हडपसरमध्ये चालणार ‘एम’ फॅक्टर ! बंडखोर उमेदवाराच्या मतांंवर विजयाचा कौल

शिवाजीनगर मतदारसंघात उच्चभ्रू सोसायट्या ते वसाहती अशा सर्व स्तरांतील उमेदवारांचा समावेश आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना थेट खात्यात निधी वाटप करण्यात आले. त्याचा लाभ वसाहतींतील महिलांनी मोठ्या प्रमाणात घेतला असण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षांत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मतदारसंघात कामांच्या माध्यमातून, बहिरट, आनंद यांनी संपर्क-उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क ठेवला.

हेही वाचा – ‘मावळ पॅटर्न’ यशस्वी होणार का?

बुधवारी शिवाजीनगर मतदारसंघात ५०.९० टक्के मतदान नोंदवले गेले. वसाहतींमधील मतदार दुपारनंतर मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडले. त्यात महिला मतदारांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळे २०१९ च्या तुलनेत सात टक्क्यांनी मतदान वाढल्याचे दिसून येत आहे. झालेल्या मतदानामध्ये काँग्रेसमध्ये बंडखोरी केलेले मनीष आनंद हे किती मते मिळवतात, त्यांनी घेतलेली मते सिद्धार्थ शिरोळे यांच्यासाठी फायदेशीर ठरतात का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यामुळे वाढीव मतदानाचे लाभार्थी कोण ठरणार याकडे लक्ष लागले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivajinagar vidhan sabha constituency who will benefit from increased voting pune print news ccp 14 ssb