पुणे : दिवाळीत मिठाईपेक्षा सुकामेवा भेट देण्याचा कल वाढला आहे. सुकामेव्यावरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कमी केल्याने सुकामेव्याच्या दरात किलोमागे १०० रुपयांनी घट झाली आहे.

मार्केट यार्डातील भुसार बाजारात कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, ओदिशा, केरळ, कोकणातून काजूची आवक होते. अमेरिकेतील कॅलेफोर्नियातून बदाम, इराणमधून पिस्ता, अफगाणिस्तानातून बेदाणा, अंजीर, जर्दाळून, सांगली, विजापूर, पंढरपूर येथून किसमिस, कश्मिरमधून अक्रोड, छत्तीसगड, मध्य प्रदेशातून चारोळीची आवक होते. दिवाळीत अनेक कंपन्या, खासगी व्यावसयिकांकडून सुकामेव्याला मागणी असते.

मिठाई नाशवंत असल्याने दिवाळीत सुकामेव्याची भेट देण्याचा कल वाढला आहे. सुकामेवा आकर्षक रंगसंगतीच्य खोक्यात भरुन त्याची विक्री केली जाते. सुकामेव्यावर १२ टक्के जीएसटी आकारण्यात येत होता. सुकामेव्यावरील जीएसटी पाच टक्के करण्यात आल्यानंतर त्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. सुकामेव्याच्या दरात किलोमागे १०० रुपयांनी घट झाली आहे’, असे मार्केटयार्ड भुसार बाजारातील सुकामेवा व्यापारी नवीन गोयल यांनी सांगितले.

सुकामेव्याचे दर

सुकामेव्याचे प्रकार सध्याचे दर जीेसटी कमी होण्यापूर्वीचे दर

काजू ९०० ते १२०० १००० ते १५००

अक्रोड १००० ते १५०० १४०० ते २०००

खारा पिस्ता १००० ते १४०० १२०० ते १६००

बेदाणे ४०० ते ६०० २०० ते ४००

बदाम ७५० ते १००० ९०० ते १२००

बेदाणे महाग

पावसामुळे द्राक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. सांगली जिल्ह्यातून होणारी बेदाण्याची आवक कमी झाली आहे. बेदाण्याच्या दरात वाढ झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

केंद्र सरकाराने सुकामेव्यावरील जीएसटी १२ टक्क्यांवरुन पाच टक्के केल्याने सुकामेव्याच्या दरात घट झाली आहे. सुकामेव्याच्या दरात साधारणपणे प्रतिकिलोमागे १०० रुपयांनी घट झाली आहे. – नवीन गोयल, सुकामेव्याचे व्यापारी, मार्केट यार्ड, भूसार बाजार