पुणे : दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. विविध कंपन्यांकडून इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर आकर्षक ऑफर्स देण्यात आल्याने बाजारातील लगबग वाढली आहे. या कंपन्यांनी ‘मॉल्स’ आणि किरकोळ विक्रेत्यांना एकसारखीच सूट दिल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.

सरकारने यंदा फक्त ‘एसी आणि ‘एलईडी’वरील वस्तू सेवा करात (जीएसटी) कपात केली आहे. मात्र, इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या खरेदीकडेही ग्राहकांचा कल वाढत आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर धुलाई यंत्राला मोठी मागणी असून, स्मार्ट फोन, लॅपटॉप, फ्रीज, स्वयंपाकघरातील उपकरणांमधील मायक्रोवेव्ह, मिक्सर-ग्राईंडर, एकर फ्रायर इत्यादी वस्तूंची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निरीक्षण व्यापाऱ्यांनी नोंदवले आहे.

पुणे इलेक्ट्रॉनिक्स हायर परचेज असोसिएशनचे मिठालाल जैन म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. यंदा गेल्या वर्षीपेक्षा २० टक्क्यांनी ग्राहक वाढले आहेत. सध्या विविध कंपन्यांच्या धुलाई यंत्रावर मोठी सूट आहे. त्यामुळे धुलाई यंत्राची मागणी वाढली आहे. त्यानंतर फ्रीज, दूरचित्रवाणी संच अशा वस्तू घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. छोट्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांनाही मोठी मागणी आहे.’

‘तंत्रज्ञान वेगाने बदलत असून, ते नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहे. घरात वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर वाढला आहे. ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी कंपन्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची निर्मिती होत असल्याचे दिसून येते. या नव्या वस्तूंकडे ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी कंपन्यांसाठी दिवाळीत मोठी संधी असते. त्यामुळे १५ ते ३० टक्क्यांपर्यंत सूट, झिरो-कॉस्ट ईएमआय, बँक सवलती आणि कॅशबॅक सारख्या ऑफर्स दिल्या जातात. विक्रेत्यांनीही ग्राहकांसाठी ‘बाय वन, गेट वन’, ‘कॅशबॅक’ आणि ‘गिफ्ट व्हाऊचर’ अशा योजना जाहीर केल्याने इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढली आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.

करोनानंतरच्या काळात ऑनलाइन विक्रीत सातत्याने वाढ झाली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले आहेत. तिथेही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती दिल्या जातात. त्याचबरोबर वस्तू घरपोच मिळत असल्याने नागरिकांची पसंती ऑनलाइन खरेदीला मिळते. यंदा ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या विक्रीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे निरीक्षण व्यापाऱ्यांनी नोंदवले.

यंदाच्या दिवाळीत इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात सवलती आणि आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानात ग्राहकांची गर्दी वाढत आहे. – मिठालाल जैन, अध्यक्ष, पुणे इलेक्ट्रॉनिक्स हायर परचेस असोसिएशन