पुणे : भाजपकडून ‘सौगाद-ए-मोदी’ चे वाटप करण्यात आले. भाजपने मुस्लिमांसाठी काही केले तर ते ‘अमर प्रेम’ आणि इतरांनी केले, तर ‘लव्ह जिहाद, असे कसे होऊ शकते? असा सवाल शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. शिवसेना ही भाजपबरोबर होती, तेव्हा प्रखर हिंदुत्ववादी होती आणि काँग्रेसबरोबर गेल्यावर हिंदुत्त्व सोडले म्हणता. मग नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे हिंदुत्त्ववादी आहेत का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ठाकरे बोलत होते. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले यावेळी उपस्थित होते.ठाकरे म्हणाले, ‘काँग्रेसबरोबर गेलो म्हणून शिवसेनेने हिंदुत्व सोडले, अशी ओरड भाजपकडून केली जाते. मग तुम्ही चंद्राबाबू नायडू, नितिश कुमार यांच्याबरोबर गेला, मग हे दोघे हिंदुत्ववादी आहेत का? ३२ लाख मुस्लीमांना ‘सौगात-ए- मोदी’चे वाटप करण्यात आले. भाजपने मुस्लिमांसाठी काही केले तर ते ‘अमर प्रेम’ आणि इतरांनी केले, तर ‘लव्ह जिहाद, असे कसे होऊ शकते?’

‘गद्दारांना उत्तर देत नाही’

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत माजी मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांबाबत उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता, ‘गद्दारांच्या प्रश्नांना उत्तर देत नाही’ असे सांगत ठाकरे यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले.

मुख्यमंत्री पदाचा राजीना देऊन चूक केली वाटत नाही

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देऊन चूक केल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन चूक केल्याचे वाटते का? असे विचारण्यात आले असता, ठाकरे म्हणाले, ‘चूक झाली असे वाटत नाही. ज्यांना पक्षाने प्रत्येकवेळी पदे दिली. मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. तेच विरोधात उभे राहत असतील तर नको ते पद? म्हणून राजीनामा दिला.’

टिळक, आगरकरांची पत्रकारिता राहिली आहे का?

पत्रकार म्हणून लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांची नावे घेतली जातात; पण ती पत्रकारिता आज राहिली आहे का? चुकीचे काम करणाऱ्या सरकारला ‘डोके ठिकाणावर आहे का?’ असा प्रश्न विचारण्याची हिंमत आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याचे कर्तव्य पत्रकारांनी बजाविले पाहिजे असे सांगतानाच आज अंधभक्त वर्ग जन्माला आला आहे. त्या अंधभक्तांना दृष्टी देण्याची जबाबदारी पत्रकारांनी घेतली पाहिजे, अशी अपेक्षाही ठाकरे यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री फडणवीस हतबल

‘राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरकार चालविताना हतबल झाले आहेत. कशासाठी हतबल आहेत मला कल्पना नाही. अनेक वर्षानंतर एवढे मोठे संख्याबळ असलेले त्यांचे सरकार आहे. केंद्र सरकार त्यांच्या पाठीशी आहे. एवढे बहुमत असलेले मुख्यमंत्री हतबलत का वागतात, हे मला समजत नाही, असेही ठाकरे म्हणाले