पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेचे (ठाकरे) प्रभारी शहरप्रमुख संजोग वाघेरे यांच्या पत्नी, महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा उषा वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीला हजेरी लावली. उषा वाघेरे यांनी लोकसभा निवडणुकीत पती संजोग वाघेरे यांचा प्रचार केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजोग वाघेरे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षपदही भूषविले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अतिशय निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पवार यांची साथ सोडली. शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश केला. या पक्षाकडून त्यांनी मावळमधून लोकसभेची निवडणूक लढविली. शिवसेनेच्या (शिंदे) श्रीरंग बारणे यांना कडवी झुंज दिली. पण, अपयश आले.

विधानसभा निवडणुकीनंतर वाघेरे पुन्हा स्वगृही राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरू असताना ७ फेब्रुवारी रोजी त्यांची शहर शिवसेनेच्या (ठाकरे) प्रभारी शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वाघेरे यांच्या पत्नी उषा वाघेरे सक्रिय होत्या. त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या बैठकीला हजेरी लावल्याने वाघेरे हे पुन्हा स्वगृही परतण्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप करून चिंचवड विधानसभेची निवडणूक अपक्ष लढलेले भाऊसाहेब भोईर हे देखील राष्ट्रवादीच्या बैठकीला हजर होते.

याबाबत शिवसेनेचे (ठाकरे) प्रभारी शहरप्रमुख संजोग वाघेरे म्हणाले, ‘उषा वाघेरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला नाही. माझ्यासोबत त्या व्यासपीठावर उपस्थित नव्हत्या. लोकसभेला त्यांनी माझा प्रचार केला. परंतु, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला नव्हता आणि नाही’.

महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आणण्याचा निर्धार

पक्ष सदस्य नोंदणी अभियान व पक्ष संघटनेचा विस्ताराबाबत राष्ट्रवादीची शुक्रवारी बैठक झाली. शहराध्यक्ष योगेश बहल, आमदार आण्णा बनसोडे, निरिक्षक सुरेश पालवे, महिला निरिक्षक शितल हगवणे यांची प्रमुख उपस्थित होती. पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर करणे, सदस्य नोंदणी अभियान शुभारंभ, आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पुन्हा एकदा महापालिकेत राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आणण्यासाठी पक्ष संघटनात्मक बांधणी करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे शहराध्यक्ष बहल यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray shivsena leader sanjog waghere s wife usha waghere attended ncp ajit pawar party meeting pune print news ggy 03 css