लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम करून वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक लढविणारे वसंत मोरे यांनी शुक्रवारी गुपचूप जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. एरव्ही माध्यमांच्या गराड्यात असणारे आणि सातत्याने समाजमाध्यमांवर चमकणारे मोरे यांनी गाजावाजा न करता उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक असतानाही पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नकारात्मक अहवाल दिल्यामुळे मोरे यांनी मनसेचा राजीनामा दिला होता. महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्यासाठी शरद पवार, संजय राऊत यांची त्यांनी भेट घेतली होती. मात्र त्यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला होता. त्यामुळे मोरे यांनी सकल मराठा समाजाच्या बैठकीच्या माध्यमातून पाठिंबा मिळविण्याची चाचपणी केली होती. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची त्यांनी आंतरवाली सराटी येथे भेट घेतली होती. त्यानंतर वंचित बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारीसाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले होते. वंचित बहुज विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर मोरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

आणखी वाचा-विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट? जाणून घ्या, अकोल्यात पारा कुठे पोहचला

पुण्याची निवडणूक दुरंगी होणार नसल्याचे सांगत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोरे यांनी धडाक्यात प्रचाराला देखील सुरुवात केली. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रभागात जात मिसळ खाणे असो किंवा पुण्यातील प्रसिद्ध कट्ट्यांना भेटी देत त्याठिकाणी निवडून आल्यास आपला आराखडा ते मांडत प्रचार करत आहे. मात्र, कोणताही गाजावाजा न करता त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज दाखल केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasant more secretly went to the collectors office on friday and filed his candidature pune print news psg 17 mrj