पुणे : महायुतीचे पुणे लोकसभासाठीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कसबा मतदारसंघात आले होते. यावेळी मतदारसंघात वाटायच्या उष्माघात प्रथमोपचार औषधी संचावर पंतप्रधानांचे छायाचित्र नसल्याने बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्या दृष्टीने प्रत्येक राजकीय पक्षाकडून प्रचार देखील सुरू झाला आहे. या निवडणुकीमध्ये भाजपने ४०० पार चा नारा दिला असून भाजपला या ४०० च्या आकड्यापासून रोखण्यासाठी काँग्रेस पक्षासह देशभरातील विरोधक एकत्रित आले आहेत. तर या निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना, तर काँग्रेस पक्षाने आमदार रवींद्र धंगेकर यांना संधी दिली असून वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पुणे लोकसभेची निवडणूक ही तिरंगी होणार आहे. या पार्श्वभूमीवर या तीनही उमेदवारांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड: अजित पवारांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटन! फुटपाथवर असलेल्या कार्यक्रमाला पालिकेची परवानगी नाही

हेही वाचा – “जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल”, अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास; म्हणाले, “युती असो किंवा महाविकास आघाडी…”

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कसबा विधानसभा मतदारसंघातील अप्पा बळवंत चौकात आले होते. त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी तेथील दुकानदार आणि कार्यकर्त्याच्या घरी जाऊन पत्रके वाटली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपले एक मत देण्याचे आवाहन केले. सध्या उन्ह लक्षात घेऊन कसबा विधानसभा मतदारसंघातील घरोघरी जाऊन उष्माघात प्रथमोपचार औषधी संच देण्याचे नियोजन केले आहे. हे औषधी संच बावनकुळे यांना दाखविण्यात आले. त्यावर केवळ मुरलीधर मोहोळ यांचा फोटो आणि संकल्पना नामदार चंद्रकांत दादा पाटील असे लिहिले होते. हे पाहिल्यावर चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित पदाधिकारी हेमंत रासने, राजेश पांडे यांना म्हणाले की, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो का नाही. आपण घरोघरी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मत मागत आहोत, तर यावर नरेंद्र मोदी यांचा फोटो का नाही टाकला, अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त करीत जाब विचारला. त्यावर या दोन्ही स्थानिक नेत्यांकडे काहीच उत्तर नव्हते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is there no pm modi photo on the heatstroke first aid kit bjp state president chandrashekhar bawankule should ask the office bearers svk 88 ssb